राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:32 PM2023-11-25T15:32:36+5:302023-11-25T15:33:19+5:30

राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

600 institutions in the state have been selected as Suman institutions, according to the information of the Health Minister | राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसुतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. 

सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: 600 institutions in the state have been selected as Suman institutions, according to the information of the Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.