अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:19 PM2019-09-06T12:19:11+5:302019-09-06T12:30:38+5:30
भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली.
विशाल शिर्के
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणे पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आले. तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल सहा कोयना धरणे भरतील इतके पाणी कृष्णेत सोडण्यात आले. त्यातील तब्बल पाच कोयना धरणांचे पाणी कोल्हापूर-महाबळेश्वरच्या घाटरांगांमधून कृष्णेत आले.
भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. राज्यात उजनी धरणाची एकूण साठ्याची क्षमता सर्वाधिक ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. तर, कोयना धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता सर्वाधिक १०० टीएमसी आहे. पुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना धरणात मावते. कृष्णा खोऱ्यातील घाटमाथ्यावर ऑगस्टच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील कराडमधे पूरस्थिती उद्भवली होती. लाखो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. कोट्यवधीरुपयांचे नुकसान या जिल्ह्यांत झाले.
कृष्णेच्या प्रमुख उपनद्यांपैकी असलेल्या कोयना, दूधगंगा, पंचगंगा, वारणा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णेत जमा झाले होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना धरणासह धोम, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, ऊरमोडीसह १३ प्रमुख धरणे आहेत. यात सध्या २०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी धरणात ०.४७ टीएमसी (६७ टक्के) पाणी आहे. हा अपवाद वगळता सर्व धरणात गुरुवार अखेरीस (दि. ५) ९५ ते १०० टक्के पाणीसाठा होता.
ही धरणे भरल्यानंतरही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. कृष्णेत यंदाच्या मॉन्सूनमधे राजापूर बंधाऱ्यातून ४२० टीएमसी पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. तर, दूधगंगा नदीतून जवळपास ८० टीएमसी पाणी कृष्णेत पोहचले. म्हणजेच तब्बल ५०० टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेतून पुढे आंध्रप्रदेशाकडे वाहिले.
भीमा नदीच्या खोऱ्यातही यंदा जोरदार वृष्टी झाली. या खोºयातील २३ धरणांपैकी माणिकडोह, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरसह १८ धरणांचे पाणी उजनी नदीत येते. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, त्यात ५३.५७ उपयुक्त आणि ६३.६५ मृतसाठा आहे. जून महिन्यात धरणातील मृतसाठा देखील उणे होता. एकट्या,खडकवासला साखळीतील धरणातून ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान २२.५० टीएमसी पाणी उजनीत जमा झाले. जिल्ह्यातील धरणातील पाण्याने उजनी धरण पूर्ण भरल्यानंतर तब्बल ७० टीएमसी पाणी भीमेत सोडण्यात आले.