बियाणे-खतांच्या काळ्याबाजारावर ६२ पथकांचा ‘वॉच’!
By admin | Published: May 23, 2017 01:41 AM2017-05-23T01:41:15+5:302017-05-23T01:41:15+5:30
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत भरारी पथके गठित
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ६२ भरारी पथके गठित करण्यात आली असून, बियाणे आणि खतांच्या विक्रीतील काळाबाजारावर या भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार आहे.
पावसाळा तोंडावर आला असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी शेतकऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.
बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बियाणे आणि खतांच्या विक्रीतील काळाबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी पाचही जिल्ह्यांत कृषी विभागामार्फत ६२ भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये तालुकास्तरीय ५६, जिल्हास्तरीय पाच आणि विभागस्तरीय एका भरारी पथकाचा समावेश आहे.
बियाणे व खतांसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास तातडीने दखल घेऊन, मोका पाहणी व तपासणी करणे, बोगस बियाणे आढळून आल्यास कारवाई करणे, संशयास्पद बियाणे आढळून आल्यास बियाण्याचे नमुने घेऊन संबंधितांवर कारवाई करणे, तसेच बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास संबंधित वरिष्ठांना माहिती देणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही भरारी पथके गठित करण्यात आली आहेत.
गठित करण्यात आलेली जिल्हा-तालुकास्तरीय भरारी पथके!
अमरावती - १५
अकोला - ०८
बुलडाणा- १४
वाशिम - ०७
यवतमाळ - १७
विभागस्तरीय - ०१
एकूण - ६२