पालघर जिल्ह्यात ६२ टक्के विद्यार्थी गणवेशाविनाच साजरा करणार स्वातंत्र्य दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 08:09 AM2024-08-14T08:09:45+5:302024-08-14T08:12:56+5:30

२७,०६० गणवेश शिवून तयार, वाटप करणे अद्याप बाकी

62 percent students in Palghar district will celebrate Independence Day without uniform | पालघर जिल्ह्यात ६२ टक्के विद्यार्थी गणवेशाविनाच साजरा करणार स्वातंत्र्य दिन

पालघर जिल्ह्यात ६२ टक्के विद्यार्थी गणवेशाविनाच साजरा करणार स्वातंत्र्य दिन

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील २,१२७ शाळांतील १ लाख ६६ हजार ९९२ विद्यार्थ्यांना गणवेश मंजूर केले होते. त्यातील फक्त ६३ हजार ८८३ म्हणजेच ३८२५ टक्के गणवेश शिवून झाले. त्यापैकी ३४ हजार म्हणजेच ५३.२२ टक्के गणवेशांचे वाटप केले आहे. अन्य २७ हजार ६० म्हणजेच ४२.३५ टक्के गणवेश शिवून तयार असले तरी त्याचे विद्यार्थ्यांना अद्यापही वाटप केलेले नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी आयोजित ध्वजवंदनाला विद्यार्थ्यांना गणवेशाअभावीच उपस्थिती दर्शवावी लागणार आहे.

गणवेश योजनेमधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीना प्रत्येकी दोन गणवेश उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश होते. राज्यभरात एका रंगाचा व एकसमान स्काऊट-गाइड विषयास अनुसरून गणवेश आणि एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्याचेही शासन आदेश आहेत.

आठ तालुक्यांतील बीआरसी आणि सीआरसीमध्ये शाळा व इयत्तानिहाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महिला आर्थिक विकास महामंडळातर्गत पहिला गणवेश प्राप्त करून देण्यात येणार आहे. सध्या डहाणू, पालघर व जव्हार या तालुक्यांचे गणवेशाचे मायक्रो कटिंग प्राप्त झाले. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत शिलाईचे काम सुरु असल्याचे सांगितले आहे.

विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष

जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोखाडा तालुका ९,८७०, तलासरी तालुका १८.३२६, वसई २६,०७५, विक्रमगड १५,८२३, वाडा १७,४८४ इतक्या गणवेश संख्येपैकी अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्यांचा गणवेश शिवून तयार झालेला नाही. ग्रामीण आदिवासी बहुल भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या गणवेशाकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रत्येकी दोन गणवेश

जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत शिलाईचे काम सुरू झाले आहे, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे एका रंगाचे व एकसमान गणवेश व स्काऊट गाइड विषयास अनुसरून गणवेश आणि एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे असे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: 62 percent students in Palghar district will celebrate Independence Day without uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.