मराठवाड्यात ६२ टक्के पाऊस; जलसाठा ३८ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:14 AM2018-09-23T05:14:00+5:302018-09-23T05:14:15+5:30
मराठवाड्यात कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
औरंगाबाद - मराठवाड्यात कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामाला कमी पावसामुळे फटका बसला असून, पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. विभागात वर्षाला ७७९.०० मि.मी. पावसाची सरासरी आहे. आजपर्यंत ४८६.९८ मि.मी. पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत ६२.५१ टक्के आहे. कमी पावसामुळे जलसाठ्यात ३७.४१ टक्के पाणीसाठा आहे.
नांदेड जिल्ह्यात ७५१. ३६ मि.मी. पाऊस झाला आहे. जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात ४९ टक्केच पाऊस झाला आहे. औरंगाबाद, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झालेला नाही.
येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील सीना-कोळेगाव या धरणांत जोत्याच्यावर पाणी अजून आलेले नाही. पाऊस नसल्याने पाणीटंचाईची समस्या अद्याप दूर झालेली नाही.
मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती
प्रकल्पाचे नाव जलसाठा
जायकवाडी ४६. ०२
निम्न दुधना २४. ५७
येलदरी ०९. २४
सिद्धेश्वर २६. १९
माजलगाव ००. ००
मांजरा ०१. ६३
पेनगंगा ६७. २५
मानार ३९. ९४
निम्न तेरणा ३८. ०६
विष्णूपुरी ९८. ०८
खडक बंधारा ८९. १९
एकूण ३८.४१