महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या
By नरेश डोंगरे | Updated: March 13, 2025 20:59 IST2025-03-13T20:57:23+5:302025-03-13T20:59:59+5:30
Holi Special Trains News: देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत.

महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या
-नरेश डोंगरे, नागपूर
प्रचंड उत्साह आणि सणांचा गोडवा घेऊन येणाऱ्या होळी तसेच धुलीवंदनाचे सण आपल्या गावी, आपल्या आप्तांत जाऊन साजरा करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. मध्य रेल्वेने होळीसाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचे नियोजन केले आहे. देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
होळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. हा सण आपल्या गावात जाऊन आपल्या प्रियजणांसोबत साजरा करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे होळी सणाच्या वेळी अचानक प्रवाशांची सर्वत्र प्रचंड गर्दी वाढते.
एकाच वेळी गर्दी वाढल्याने अनेक प्रवाशांना रेल्वे गाड्यांमध्ये जागाच मिळत नाही. मिळेल त्या जागेवर प्रवासी बसत असल्याने कन्फर्म तिकिट काढून बसलेल्या प्रवाशांसह सर्वांनाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे अनेक जण ऐनवेळी आपल्या गावाला जाण्याचे नियोजन रद्द करतात. त्यामुळे त्यांच्या सणाच्या आनंदावर काहीसे विरजण पडल्यासारखे होते.
हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रवाशांना त्यांच्या गावात जाऊन सण साजरा करता यावा म्हणून मध्य रेल्वेने देशभरात १८४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ६२ गाड्या महाराष्ट्रातील विविध भागात धावणार आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल कोचही राहणार आहेत. या गाड्या आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही स्वरूपात राहणार आहेत.
नागपूर-विदर्भासाठी धावणाऱ्या गाड्या
६२ गाड्यांमध्ये नागपूर विदर्भात १६ गाड्या धावणार आहेत. त्यात मुंबई नागपूर या स्पेशल ट्रेनच्या ८ तसेच पुणे नागपूर स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्यांचाही समावेश आहे. ठिकठिकाणी राहणाऱ्या नागपूर विदर्भातील प्रवाशांना त्याचा चांगला लाभ मिळणार आहे.
गर्दीचे रेल्वेकडून नियोजन
प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रमुख स्थानकांवर पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालय सुविधा असलेली होल्डिंग एरिया तयार केला आहे. विशेष गाड्यांमध्ये सुरळीत चढण्यासाठी अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करून गर्दी टाळण्यासाठी रांगेची व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेवरही लक्ष
रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये झालेल्या गर्दीचा फायदा उठवून गुन्हेगारांनी संधी साधू नये यासाठी सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. त्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष नजर राहणार आहे.