६,२४३ दात्यांची नोंदणी

By admin | Published: November 26, 2015 02:47 AM2015-11-26T02:47:17+5:302015-11-26T02:47:17+5:30

लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या ‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रा’ द्वारे अवयवदानासंबंधी सर्व कार्यवाहींचे समन्वयन केले

6,243 registration of donors | ६,२४३ दात्यांची नोंदणी

६,२४३ दात्यांची नोंदणी

Next

मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या ‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रा’ द्वारे अवयवदानासंबंधी सर्व कार्यवाहींचे समन्वयन केले जात असून, २०११ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत येथे ६ हजार २४३ दात्यांनी अवयवदानासाठी नोंदणी केलेली आहे. या केंद्राच्या समन्वयातून आतापर्यंत ३९८ गरजूंना एक नवे जीवन मिळाले आहे.
पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी राष्ट्रीय अवयव दान दिनानिमित्त (२७ नोव्हेंबर) असे आवाहन केले आहे की, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अवयवदान नोंदणी अवश्य करावी. अवयवदान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना आवर्जून सांगावी. नोंदणी केल्यावर प्राप्त होणारे ‘डोनर कार्ड’ शक्य असल्यास आपल्या फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स-अप इत्यादी ‘सोशल मिडिया अकाउंट’ वर जरूर अपलोड करावे, जेणेकरून आपल्या अवयव दाता नोंदणीची माहिती आपल्या परिचितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल व एका सकारात्मक कायार्बाबत जनजागृतीदेखील होऊ शकेल.
मृत्यूनंतर शरीरातील अवयवांचा सकारात्मक उपयोग व्हावा यासाठी अवयव दाता म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत असून यासाठी केवळ एक पानी अर्ज भरुन द्यावा लागतो. या अर्जामध्ये आपले नाव, पत्ता, वय यासारख्री अत्यंत प्राथमिक माहिती नमूद करावी लागते. तसेच या अर्जावर अर्जदाराची व त्याच्या जवळच्या एका नातेवाईकाची स्वाक्षरी असणे आवश्यक असते. हा अर्ज भरुन झाल्यावर तो महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील संबंधित कक्षाकडे जमा करणे आवश्यक आहे. दरम्यान, सार्वजनिक व खासगी रुग्णालयातून २५६ मूत्रपिंडे, १३६ यकृत , ४ हृदये व २ फुफ्फुसे अशा ३९८ अवयावांचे प्रत्यारोपण विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून केले आहे. अवयव दानासंबंधीच्या प्रतीक्षा यादीवर २,७३७ गरजूंची नोंदणी आहे. ज्यामध्ये २५६५ मूत्रपिंड, १५५ यकृत, १५ हृदय व २ फुफ्फुसे यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
कोण करू शकते अवयवदान ?
- १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती अवयव दाता म्हणून नोंदणी करु शकते. १८ वर्षांखालील व्यक्तीला अवयव दाता म्हणून नोंदणी करावयाची झाल्यास त्यासाठी पालकांची परवानगी असणे आवश्यक आहे.
-अवयव दान दोन प्रकारे करता येते. यातील पहिला प्रकार म्हणजे जिवंतपणी आपल्या जवळच्या नातेवाईकांना अवयव दान करणे. तर दुसरा प्रकार म्हणजे मृत व्यक्तीच्या अवयवांचे दान गरजू व्यक्तींना करणे.
-जिवंत व्यक्ती केवळ आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी अवयव दान करु शकते. यामध्ये मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहिण, पती-पत्नी यांचा समावेश होतो. याव्यतिरीक्त कोणालाही अवयव दान करावयाचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते.
-मृत व्यक्तीचे अवयव दान करावयाचे झाल्यास व व्यक्तीचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडून झाला असल्यास अशा व्यक्तीच्या फक्त डोळ्यांचे व त्वचेचे दान करता येऊ शकते.
-मृत्यू ‘ब्रेन-डेड’ स्वरुपाचा असल्यास व हृदयक्रिया सुरु असल्यास अशा व्यक्तीच्या बहुतेक प्रमुख अवयवांचे दान करता येते. यामध्ये हृदय, डोळे, त्वचा, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुसे, हृदयाची झडप, स्वादुपिंड व कानाचे ड्रम इत्यादींचा समावेश होतो.
-लाईफ सपोर्ट सिस्टीमवरील ब्रेन-डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास, रुग्णाच्या अवयवांचे दान करता येऊ शकते.
-‘ब्रेन-डेड’ स्वरुपाचा मृत्यू हा प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातच घोषित करता येतो.
-‘ब्रेन डेड’ झालेल्या
व्यक्तींच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपित करता येऊन साधारणपणे १० ते १२ गरजूंना नवे आयुष्य मिळू शकते. ही बाब लक्षात घेता एक व्यक्ती १० ते १२ कुटुंबांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणू शकते.
मृत्यूनंतर किती तासांत अवयव प्रत्यारोपण शक्य?
डोळे : सहा तासांच्या आत काढून प्रत्यारोपित करता येतात किंवा आवश्यकतेनुसार जतनासाठी नेत्रपेढीकडे पाठविता येतात.
त्वचा : सहा तासांच्या आत किंवा आवश्यकतेनुसार जतनासाठी त्वचापेढीकडे पाठविता येते.
किडनी : ४८ तासांच्या आत
फुफ्फुस : सहा तासांच्या आत

Web Title: 6,243 registration of donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.