महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७०, दुसऱ्या टप्प्यात किती मतदान?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:15 PM2024-04-26T20:15:35+5:302024-04-26T20:16:00+5:30
Vote Turn Out in Maharashtra phase 2: एकूण मतदानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ही वाढ फारशी नसणार असून ती पाहता मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
राजकीय धुमश्चक्रीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यात ६३.७० टक्के मतदान झाले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यात मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या अंदाजे आकडेवारीनुसार आठ मतदारसंघांत ५३.७० टक्के मतदान झालेले आहे.
एकूण मतदानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ही वाढ फारशी नसणार असून ती पाहता मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. उन्हाचा कडाका, लग्नसराई आणि राज्यातील राजकीय खिचडी यामुळे मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसत आहे.
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५३.७० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये वर्धा- ५६.६६ टक्के, अकोला- ५२.४९ टक्के, अमरावती- ५४.५० टक्के, बुलढाणा- ५२.२४ टक्के, हिंगोली- ५२.०३ टक्के, नांदेड- ५२.४७ टक्के, परभणी- ५३.७९ टक्के, यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के एवढे मतदान झाले आहे.
तर देशातील ८८ मतदारसंघांत सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. तर पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांत ६५.५ टक्के मतदान झाले आहे. कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे कोणाच्या तोट्याचे याची चर्चा होऊ लागली आहे.