धक्कादायक! राज्यातील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 12 अधिकारीही संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:54 PM2020-04-22T14:54:27+5:302020-04-22T15:32:01+5:30
धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच चालले आहेत. आता येथील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. यात 12 अधिकारी आणि 52 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्टदेखील पॉजिटिव्ह आला आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानी तैनात असलेल्या महिला एएसआयला कोरोनाची लागण झाल्याने येथे तैनात असलेल्या इतर 6 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल्स येथील 'वर्षा' निवसस्थानावर दोन दिवसांपूर्वीच एक असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबलला तैनात करण्यात आले होते.
अशी आहे राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती -
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी 552 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या 5 हजार 218 वर पोहोचली होती. तर 19 मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा 218 झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत 355 रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 3 हजार 451 झाली आहे. तर शहर-उपनगरात 12 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा 151 वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे 2 हजार 887 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा 25 लाख 36 हजारांवर गेला आहे.
देशात 61 जिल्ह्यांत एकही नवा रुग्ण नाही -
देशात आतापर्यंत ३ हजार 975 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 14 टक्के होते. ते आता 17.48 वर गेले आहे. सोमवारी 705 जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात 20,080 रुग्ण आहेत. तर 645 वर मृत्यू झाले आहेत.