६४ विद्यार्थ्यांचा भार दोन शिक्षकांवर
By Admin | Published: August 26, 2016 04:57 PM2016-08-26T16:57:55+5:302016-08-26T16:57:55+5:30
तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि.26 - तालुक्यातील कापडणे गावातील खाज्या नाईक परिसरातील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये मंजूर तीन शिक्षकांच्या पदांपैकी एक जागा रिक्त आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बऱ्याचदा इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ६४ विद्यार्थ्यांना दोन शिक्षक शिकविताना दिसतात. या शाळेत त्वरित एका शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास पालकांनी आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.
दोन शिक्षकांवर अतिरीक्त ताण
जि.प. शाळा क्रमांक तीन ही लांब अंतरावरील धनूर गावाजवळ म्हणजेच कापडणे गावाच्या हद्दीत येते. या शाळेत तीन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, येथे जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तेव्हापासून केवळ दोनच शिक्षक इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळताना अडचणी येताहेत.
शिक्षकांना करावी लागते तारेवरची कसरत
येथील शाळेत दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक रजेवर गेला, तर उर्वरीत एका शिक्षकाला तारेवरची कसरत करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागते. बऱ्याचदा वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू असल्यास शांत बसा, असे सांगावे लागते. येथील जि.प. शाळा क्रमांक तीनमध्ये एकूण चार वर्ग आहेत. पहिल्याच्या वर्गातील पटावर १८, दुसरीचे १४, तिसरी १६ व चौथीच्या वर्गात १६ असे एकूण ६४ विद्यार्थी पटावर आहेत.
तीन शिक्षकांची नियुक्ती गरजेची
येथील जि.प. शाळेत तीन शिक्षकांची नियुक्ती असणे गरजेचे आहे. मात्र, दोन शिक्षक संपूर्ण शाळा व त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांभाळतात. त्यामुळे एक शिक्षक रजेवर गेला, तर अनेक अडचणी शिक्षकांना येतात. विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, तर शिक्षकांना अध्यापनाचे काम थांबवून विद्यार्थ्यांना शांत करावे लागते.
...तर शाळा बंद आंदोलन
खाज्या नाईक नगरातील जि.प. शाळेत येत्या आठवड्यात शिक्षकाची नियुक्ती त्वरित करण्यात झाली नाही, तर गावातील आदिवासी बांधवांनी शाळा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची फरपट होते. शिक्षक नियुक्ती होत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शिक्षण सभपतींच्या गावात शिक्षकांची कमतरता
कापडणे गावाला जि.प.चे शिक्षण सभापतीपद नूतनताई पाटील यांच्या रूपाने मिळाले आहे. ते पद म्हणजे गावाचे मोठे भूषण आहे. सभापतीपद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी अपेक्षा पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे. मात्र, शिक्षकाची एक जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी भरून काढणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
या शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करावी, यासंदर्भात गावातील लोक प्रतिनिधीसोबतच ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुषंगाने येथील शिक्षण अधिकाऱ्यांशी वारंवार शिक्षकाची नियुक्ती करावी, मागणी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे माञ या कडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. माञ येथील शाळेत ताबडतोब शिक्षक नियूक्त करण्यासाठी माझा प्रयत्न चालू राहणार व या विदयार्थ्यांचे शैक्षणिक होणारे नूकसान लवकरच थांबवले जाईल.
- नूतन शेखर पाटील, सभापती, शिक्षण व आरोग्य, जिल्हा परिषद
शाळेत तीन शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. जूनपासून शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त आहे. त्या रिक्त जागेवर एका निलंबित असलेल्या शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे अशी केवळ चर्चा चालू आहे. मात्र, अजुनपर्यंत कोणाचीच नियुक्ती झालेली नाही.
- सुशिला पाटील, मुख्याध्यापिका, जि.प. शाळा क्रमांक