राज्यात नऊ वर्षांत ६४८ बिबट्यांचा मृत्यू; आतापर्यंत ८३ बिबट्यांची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:04 AM2020-10-07T03:04:25+5:302020-10-07T06:43:46+5:30
नाशिक, अहमदनगर पुणे, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांत बिबट्याचे वास्तव्य अधिक आहे.
- अझहर शेख
नाशिक : कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत गुजराण करण्यात नैसर्गिकरीत्या पटाईत असलेला मार्जार कुळातील अत्यंत चपळ वन्यप्राणी म्हणून ओळख असलेल्या बिबट्याचा जगण्यासाठीचा मोठा संघर्ष सुरू आहे. राज्याने मागील नऊ वर्षांमध्ये ६४८ बिबटे गमावले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
राज्यातील नाशिक, अहमदनगर पुणे, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांत बिबट्याचे वास्तव्य अधिक आहे. जंगल कमी झाल्याने बिबट्याने ऊस, मक्याच्या शेतीमध्ये आश्रय घेतला आहे. भारतीय वन्यजीव कायदा संरक्षित अधिसूची-१ मध्ये बिबट्याला स्थान देण्यात आले आहे. तरीही बिबट्याची शिकार होतच असते. विजेचा शॉक, विषप्रयोग, सापळा लावून किंबहुना बंदुकीनेसुद्धा शिकार करण्यात आल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे. गेल्या नऊ वर्षांत ८३ बिबट्यांची शिकार झाली आहे.
‘रोडकिल’चे २२१ बिबटे ठरले बळी!
‘रोडकिल’ची समस्या दिवसेंदिवस मानवासह वन्यप्राण्यांसाठीसुद्धा घातक बनत चालली आहे. राज्यात गत ९ वर्षात २२१ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
९२ बछड्यांनी गमावला जीव
राज्यात २०११ पासून २०१९ अखेरपर्यंत तब्बल ६४८ बिबटे मृत्युमुखी पडले. यामध्ये ९२ बछड्यांचा समावेश आहे. ५५ बछडे नैसर्गिकरीत्या तर ३७ अपघाती मृत्युमुखी पडले आहेत.
नाशिक : ५०पेक्षा जास्त बिबट्यांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांत ५० ते ६० बिबटे विविध कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. चालू वर्षी आतापर्यंत १२ बिबटे गतप्राण झाले आहेत. यामध्ये रस्ते अपघातात मरण पावलेल्या बिबट्यांची संख्या अधिक आहे.
वर्षनिहाय मृत्युमुखी पडलेले बिबटे
२०११ ७०
२०१२ ६८
२०१३ ४३
२०१४ ६५
२०१५ ६६
२०१६ ८९
२०१७ ८६
२०१८ ८८
२०१९ ७३