महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 09:14 AM2024-03-09T09:14:40+5:302024-03-09T09:15:21+5:30

लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

650 people poisoned by Mahaprasad's bhagr; four districts of Marathwada | महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

लातूर/हिंगोली : महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या. लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

 वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद देण्यात आला. तो खाल्ल्याने  ३१५ जणांना गुरुवारी रात्री त्रास झाला. डॉक्टरांनी गावातच ३०६ जणांवर उपचार केले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही ९३ जणांवर प्रथमोपचार करण्यात आले. 

हिंगोलीत २४ भाविकांना विषबाधा  
पंधरवड्यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील दीडशे भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती. पुन्हा गुरुवारी खुडज (ता.सेनगाव) येथील २४ भाविकांना भगरमधून विषबाधा झाली. 

परभणीत ८० बाधित
परभणी जिल्ह्यात गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी दिली.

बीडमध्ये ५५ जण
अंबाजोगाई व गेवराई तालुक्यातील तब्बल ५५ जणांना विषबाधा झाली. उपवासाची भगर खाल्ल्याने ही बाधा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. 

धुळे ५२ बाधित
तालुक्यातील अमळथे येथे भगर खाल्याने ५२ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच बालके, २० महिलांचाही समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 
 

Web Title: 650 people poisoned by Mahaprasad's bhagr; four districts of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.