क्रिकेट बंदोबस्तासाठी लागणार ६६ लाख

By admin | Published: July 3, 2017 05:03 AM2017-07-03T05:03:22+5:302017-07-03T05:03:22+5:30

क्रिकेट सामना सुरळीतपणे पार पडण्यासाठी, आयोजकांना आता पोलीस बंदोबस्ताचा पुरेपूर मोबदला द्यावा लागणार आहे. मुंबईत टी-२०, एकदिवसीय

66 lakhs for the cricket ballot | क्रिकेट बंदोबस्तासाठी लागणार ६६ लाख

क्रिकेट बंदोबस्तासाठी लागणार ६६ लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेट सामना सुरळीतपणे पार पडण्यासाठी, आयोजकांना आता पोलीस बंदोबस्ताचा पुरेपूर मोबदला द्यावा लागणार आहे. मुंबईत टी-२०, एकदिवसीय सामन्यासाठी ६६ लाख, तर कसोटी सामन्याच्या एका दिवसासाठी ५५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर नवी मुंबई, पुणे व नागपूर येथे होणाऱ्या मॅचमधील एका दिवसासाठी अनुक्रमे ४४ व ३८.५० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
या आर्थिक वर्षापासून हा दरपत्रक लागू करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्याशिवाय विशेष बंदोबस्तासाठी अतिरिक्त शुल्कही आकारले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचे तीनही प्रकारचे सामने सातत्याने होत असतात. त्याला क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी होत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त अत्यावश्यक बाब बनलेली आहे. सामन्याच्या आयोजनातून क्रिकेट संघटना करोडोची कमाई करीत असताना, बंदोबस्ताचे शुल्क काही हजारात आकारले जात होते. त्यामुळे गेल्या वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात, महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या बंदोबस्तासाठी शुल्कनिश्चिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीसाठी दराची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यात मुंबईत वनडे, टी-२० च्या प्रत्येक सामन्यासाठी ६६ लाख, तर कसोटीच्या एका दिवसासाठी ५५ लाख रुपये आकारले जातील. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई, पुणे व नागपुरात होणाऱ्या सामन्यासाठी कमी शुल्क आकारले जाणार आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या वनडे, टी-२०च्या सामन्यासाठी ४४ लाख तर कसोटीच्या सामन्यातील एका दिवसासाठी ३८.५० लाख रुपये द्यावे लागतील.

अतिरिक्त शुल्क

विशिष्ट सामन्यासाठी धमकी किंवा अनुचित परिस्थिती उद्भविण्याची शक्यता असल्यास, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तही पुरवावा लागणार आहे. त्यासाठी आयोजकांना किमान २५ टक्के अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. मात्र, त्याबाबत घटकप्रमुखांना पोलीस महासंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Web Title: 66 lakhs for the cricket ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.