कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:41 IST2025-03-03T06:39:07+5:302025-03-03T06:41:33+5:30

सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. तसेच, १८४ साक्षीदारांचे जबाब घेतले असून, त्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे.

66 pieces of evidence and 184 answers against the walmik karad gang in beed santosh deshmukh case | कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद

कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराड म्होरक्या असलेल्या या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली. तसेच, एका लोखंडी पाइपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली. हे पुराव्यांसह सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. तसेच, १८४ साक्षीदारांचे जबाब घेतले असून, त्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे.
  
सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरण करून हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. आता मारहाण, खंडणी आणि हत्या या तिन्ही प्रकरणांचे एक हजार पानांचे दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले. याचे अवलोकन केल्यानंतर अंगावर शहारे आणणारे कृत्य या टोळीने केल्याचे दिसते.  

मारहाण करताना ‘एन्जॉय’ केला देशमुख यांचे कपडे काढून मारहाण केली. हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद  साजरा करीत असल्याचा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला. आरोपींनी याचा शेअर केलेला व्हिडीओदेखील सीआयडीच्या हाती लागला आहे.  

ऑडिओ, व्हिडीओ क्लिपही जप्त

कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून खंडणी मागितली होती. याचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीने जप्त केले आहे. काही व्हिडीओदेखील सीआयडीच्या हाती लागले आहेत. यासह चाटेच्या कार्यालयातील बैठक, नांदूर फाटा येथे हत्येचा रचलेला कट आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केल्याचे सीआयडीने न्यायालयात सांगितले. 

१२ मार्चला सुनावणी

हत्या प्रकरणात एकूण ९ आरोपी होते. यातील सिद्धार्थ सोनवणे याला पुराव्यांअभावी यातून वगळले आहे. आता १२ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.  

मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा : रामदास आठवले 

धनंजय मुंडे यांचा खुनाशी थेट संबंध असल्याचे पुरावे नसले, तरी प्रमुख आरोपी कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्याच्यावरच या प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून ठपका असल्याने नीतिमत्तेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात व्यक्त केली. 

काय आढळले पुरावे?

- एक गॅसचा पाइप ज्याची लांबी ४१ इंच आहे. एक बाजू गोलाकार केलेली व त्यावर काळ्या करदोड्याने गुंडाळून मूठ तयार केली. याच पाइपवर लालसर रक्ताचा डाग आढळला.

- एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाइप त्यात लोखंडी तारेचे ५ क्लच वायर बसवले. त्यात लोखंडी मुठीची लांबी ५.५ इंच आहे. त्यास बसवलेल्या क्लच वायरची मुठीसह लांबी ४१.५ इंच आहे.

- अपहरण केलेल्या वाहनातील चालक सीट, मॅटिंग व इतर ठिकाणी रक्ताचे डाग.

- सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले.

- प्लॅस्टिकचे काळ्या काचाचे, काळ्या रंगाचे दोन गॉगल्स.

- काळ्या व पांढऱ्या रंगाचा गोल गळा असलेले टी शर्ट.

- एक काळ्या रंगाची १० नंबर साइज असलेली स्लिपर चप्पल.

- एक काळ्या रंगाचे लेदर जाकीट. 

-एक काळ्या रंगाचे घड्याळ, काळ्या रंगाचा बेल्ट. 

- आवाजाचा नमुना (अहवाल अप्राप्त).
 

Web Title: 66 pieces of evidence and 184 answers against the walmik karad gang in beed santosh deshmukh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.