६६ अधिकाऱ्यांची वाजत-गाजत मिरवणूक
By admin | Published: November 5, 2014 09:24 PM2014-11-05T21:24:40+5:302014-11-05T23:43:37+5:30
अहिरे : ग्रामीण भागातील तरुणांच्या जिद्दीला गावकऱ्यांचा सलाम
खंडाळा : महाराष्ट्रातील खेडोपाड्यात अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून शासनाच्या वर्ग-१ पदी नियुक्त झालेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अहिरे या ठिकाणी पार पडला. अहिरे ग्रामस्थांच्या वतीने या सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
अहिरे, ता. खंडाळा येथील गिरीश धायगुडे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्या सोबत २०१४ च्या संपूर्ण टीममधील ६६ नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. खेड्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथील प्रमुख संगीतादेवी पाटील, बालविकास अधिकारी स्नेहा देव, प्रकल्प अधिकारी स्वाती कुलकर्णी, कृषी अधिकारी शाहूराज मुळे, संशोधन अधिकारी जालिंदर काकडे, उपसंचालक चंद्रकांत टिकोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय धायगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.
सत्कार समारंभापूर्वी सर्वच अधिकाऱ्यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अधिकारी गावच्या सत्काराने आणि पे्रमाने भारावून गेले. या नवनियुक्त अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती.या कार्यक्रमासाठी सरपंच कमल धायगुडे, उपसरपंच विकास धायगुडे, रामचंद्र धायगुडे, सुभाष धायगुडे, चंद्रकात धायगुडे, यशवंत काळे, मोहन काळे, राजेंद्र धायगुडे, डॉ. सतीश सोनवणे यांसह ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सत्काराने अधिकारी भारावले
स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या पुणे येथे सुरू आहे. यात अहिरे येथील गिरीश धायगुडे याचाही समावेश होता. ग्रामस्थांनी त्याच्या सत्काराचे नियोजन करण्याचे ठरविले. पण फक्त आपल्या पोराचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्यासह यशस्वी झालेल्यांनाही आमंत्रित करू, असा विचार पुढे आला. अवघ्या गावाने हा विचार उचलून धरला आणि चक्क ६६ अधिकारी एकाच वेळी या गावात दाखल झाले. ढोल ताशांच्या गजरात त्यांची निघालेली मिरवणुक आणि सुवासिनींचे औक्षण अशा वातावरणात हे अधिकारी कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचले.
खेड्यात शिक्षण घेऊनही राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासन सेवेत येण्याचा निश्चितच आनंद होत आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. म्हणूनच या पदाचा वापर केवळ लोकसेवेसाठी करणार आहोत. लोकांसाठी करणार आहोत. लोकांसाठी प्रशासन असते, याचे भान आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. देशासाठी काही तरी चांगले करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे.
- गिरीश धायगुडे, नवनियुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी
अहिरे गावात आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी केलेला सत्कार मनापासून आवडला. आपल्या मुलाबरोबरचं अन्य यशस्वीतांचाही कौतुक सोहळा करण्याचा मोठेपणा अहिरे ग्रामस्थांमध्ये आहे. आमच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी केलेली तयारी आणि शिस्तबध्द नियोजनाने आम्ही सगळेच थक्क झालो. त्यांच्या या सत्काराने यशाचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे.
-ज्ञानदा फणसे, नवनियुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी