विदर्भात ६६.१५ लाख रुपये जप्त
By admin | Published: October 14, 2014 12:58 AM2014-10-14T00:58:28+5:302014-10-14T00:58:28+5:30
निवडणूक भरारी पथकाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यात एस.टी. स्टँडवर ५३ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यात १३ लाख १५ हजार रुपये पकडले.
दिग्रस राष्ट्रवादी कार्यालय : प्रत्येकी दीड हजाराची ११० पाकिटे आढळली
नागपूर : निवडणूक भरारी पथकाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यात एस.टी. स्टँडवर ५३ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यात १३ लाख १५ हजार रुपये पकडले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून येत असलेल्या एका इंडिका कारमध्ये सोमवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान पथकाने कुऱ्हाडी बसस्थानक येथे संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यामुळे भरारी पथकाने बसस्थानक येथे इंडिका कारची तपासणी केली असता गाडीत ५३ लाख रूपयांची रोकड मिळून आली. या गाडीसोबत संजय सुरजलाल नंदनवार (२२), विशाल गोविंद कुर्वे (३२), पंकज बांगरे (२६) आणि रवी पारधी (२१) हे चार तरूण होते.
या तरूणांनी गोरेगाव येथील एटीएम मशीन टाकण्यासाठी सदर रक्कम आणल्याचे सांगितले. पथकाने पकडलेली रोकड गोरेगाव पोलीस ठाण्यात जमा केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस आणि पुसद येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान सोमवारी १३ लाख १५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुसद-दिग्रस मार्गावर घाटोडीनजीक भरारी पथकाला एका ओमनी कारवर (एम.एच.१४-डीएम-८२२३) संशय आला. म्हणून या पथकाने सदर कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. कार थांबवून तपासणी केली असता त्यात आठ लाख रुपये सापडले. ही रक्कम बँक आॅफ इंडियाच्या एटीएमची असल्याचे चालकाने सांगितले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती. देवानंद धबाले, भरारी पथक प्रमुख ठाकरे, मंडल अधिकारी जाधव, फौजदार विशाल बहात्तरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे दिग्रस येथे डॉ. मनीष पाटील (रा. पुसद) यांच्या वाहनातून साखरा गावानजीक साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या रकमेबाबत ते निवडणूक विभागाला समाधानकारक माहिती देऊ शकले नाही.
दिग्रसच्या तायडे लॉजमधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून पैशाचे वाटप होणार असल्याची गोपनीय माहिती येथील निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार सी.सी. कोरे, विस्तार अधिकारी विलास जाधव यांना सोमवारी सायंकाळी मिळाली. त्यावरून त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन प्रचार कार्यालयाची तपासणी केली. पथकाने रोखेसह हे साहित्य जप्त केले. पाकिटे फोडल्यानंतर त्यामध्ये एकूण १ लाख ६५ हजार रुपये निघाले.
पथकाने प्रचार कार्यालय गाठताच तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. त्यामुळे केवळ हे साहित्य जप्त केले. त्यात प्रत्येकी एक हजार आणि दीड हजाराची रोकड असलेली ११० पाकिटे आढळून आली. (प्रतिनिधी)