राज्यात ६७ नवीन जिल्ह्यांची मागणी, ११३ नवीन तालुक्यांचीही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:37 AM2018-07-08T05:37:28+5:302018-07-08T05:37:43+5:30
राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे.
- मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर - राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे. याशिवाय राज्यात ११३ नवीन तालुके निर्माण करण्याची मागणीही सरकारकडे प्राप्त झाली आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात नवीन जिल्हानिर्मिती व विभाजनाबाबत ही वस्तुस्थिती स्पष्ट केली. अहमदनगरच्या उत्तर विभागाचा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे मुख्यालय श्रीरामपूर, संगमनेर की शिर्डी येथे करायचे आहे? यावरून अनेक वर्षांपासून या जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे पडले आहे.
जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यावर सरकार अभ्यास करीत आहे. अहवालाच्या तपासणीअंती धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निश्चित केल्या जाणाऱ्या धोरणानुसार व निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे, तसेच अन्य जिल्ह्यांचे विभाजन व पुनर्रचना करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे उचित निर्णय घेण्यात येणार आहे.
अहमदनगर, बीडसह राज्यातील २४ जिल्ह्यांचे विभाजन करून ६७ नवीन जिल्हे निर्माण करण्याची, तसेच राज्यात ११३ नवीन तालुके नवीन करण्याची मागणी विविध माध्यमांद्वारे प्राप्त झाली आहे, असे महसूलमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.
तालुका विभाजनाबाबत कोकण विभागाच्या महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निकष ठरविण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे.