दप्तरामुळे ६८% मुलांना पाठदुखी!
By Admin | Published: September 7, 2016 05:56 AM2016-09-07T05:56:18+5:302016-09-07T05:56:18+5:30
दप्तराचे ओझे वाहून-वाहून ७ ते १३ वयोगटातील ६८ टक्के शाळकरी मुलांना पाठदुखी आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
कोलकाता : दप्तराचे ओझे वाहून-वाहून ७ ते १३ वयोगटातील ६८ टक्के शाळकरी मुलांना पाठदुखी आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडियाने (असोचेम) त्यांच्या आरोग्य समितीमार्फत देशात नुकत्याच केलेल्या पाहणीत १३ वर्षांखालील ६८ टक्के शाळकरी मुलांना सौम्य स्वरूपाची पाठदुखी असल्याचे आढळले आहे. यातून वेदना वाढत जातात आणि काही जणांना पाठीत कुबड येणे सुरू होते.
पाहणी अहवालात म्हटले आहे की, ७ ते १३ वयोगटातील ८८ टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुले त्यांच्या वजनाच्या ४५ टक्के वजन पाठीवर वाहून नेतात. त्यात पुस्तकांशिवाय दर दिवसाआड स्केटिंग, तायक्वांदो, खेळाचे साहित्य, पोहण्याची बॅग, क्रिकेटचे साहित्य असते. त्यामुळे मणक्याची गंभीर स्वरूपाची हानी होते आणि अनेकदा बरे न होणारे पाठीचे दुखणे बळावते. कमी वयात मणक्यांना आलेली सूज, स्लीप डिस्क, सततची पाठदुखी, मणक्याची लवकर झीज होणे आदी तक्रारी मुलांना आहेत, असे असोचेमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष बी. के. राव यांनी सांगितले.
राज्य सरकारने शाळांमध्ये योग्य ते लॉकर्स उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. पाठीच्या वाढत्या तक्रारींचा आणि मणक्याचा आकार बदलण्याचा संबंध हा अतिरिक्त आणि असमान ओझ्याशी आहे. अतिरिक्त ओझ्यामुळे येणाऱ्या ताणाने मुलांच्या मस्कोक्युलेटल सीस्टिमच्या वाढीवर परिणाम होतो.
मुलांच्या दप्तराचा कायदा २००६ नुसार दप्तराचे ओझे मुलाच्या शरीराच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त असू नये. नर्सरी व बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी कोणतेही दप्तर वाहू नये आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी दप्तराबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करावे.