६८ वर्षांची झाली एस.टी.! :

By Admin | Published: June 1, 2016 02:20 AM2016-06-01T02:20:14+5:302016-06-01T08:31:46+5:30

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक,

68 years old, ST! : | ६८ वर्षांची झाली एस.टी.! :

६८ वर्षांची झाली एस.टी.! :

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडण-घडण झाली, त्यामध्ये एस. टी. बसचा वाटा आहेच. एस.टी.ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कच्च्या रस्त्यावरील धुराळा उडवत, ऊन-पावसाची तमा न बाळगता, प्रसंगी वादळाचे तडाखे सहन करत राज्याची ध्येय-धोरणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे केलेले आहे. या ६८ वर्षांच्या कालखंडात अनेक चढ-उतार एस.टी.च्या बसने ओलांडले आहेत.

केवळ ३५ बेडफोर्ड वाहनांवर १ जून १९४८ला एस.टी.ची सुरु वात झाली. एस.टी. ऐवजी सरकारी बस अशीच ओळख होती. प्रवासासाठी रस्ते अतिशय खराब असल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण फार. त्यामुळे साधारण १५० कि.मी.च्या पुढे प्रवास होत नव्हता. गाड्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ड्रायव्हरला अवजारांची पेटी बरोबर घ्यावी लागायची.
एस.टी.ची पहिली बस धावली ती पुणे-नगर या शहरांदरम्यान. नगर शहरात साखर कारखान्याची निर्मिती होऊ लागली होती, त्यामुळे दळण-वळणाचा प्रश्न होताच. पुणे ते नगरचे त्याकाळी तिकीट होते ९ पैसे!
ट्रक किंवा जीपच्या पुढील आकार कसा असतो, तसाच पुढील आकार या सरकारी वाहनाचा होता. संपूर्ण बॉडीची बांधणी व आसन-व्यवस्था लाकडाची होती. खिडक्या म्हणून खाकी ताडपत्रीची तावदान. हॉर्न वाजवत पम पम करत एस.टी गावात आली की तिचे फार जल्लोषात स्वागत होत असे. रात्रीच्या वस्तीला गावात असलेल्या गाडीला सकाळी जेव्हा स्टार्ट करायचे असे तेव्हा गाडीच्या पुढील भागात एक पुली असायची. त्या पुलीला कंडक्टर हँडल मारून गाडीचे इंजिन स्टार्ट करायचा. थंडीच्या दिवसात हे काम फार जिकरीचे असायचे. थंड झालेले इंजिन गरम व्हायला वेळ लागायचा. मग गावातील थोडेसे दणकट ग्रामस्थ हँडल मारायच्या कामात कंडक्टरची मदत करायचे.
खाकी गणवेश व डोक्यावर पिक-कॅप हा कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा पेहराव. गावात या सरकारी गाडीचा व कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा फारच सन्मान. गावाचे सरपंच व कोतवाल अगदी त्यांची जेवणापासून ते राहण्यापर्यंत व्यवस्थित काळजी घेत असत. या प्रवासी वाहनाची गरज वाढू लागली तस-तसा विस्तारही सुरू झाला.
मोठमोठ्या कंपन्यांची बांधणी असलेली एस.टी. बस तयार होऊ लागली. ती धावू लागली.
आपल्या गावात एस.टी. यावी म्हणून सर्व गावाच्या गाव अंगमेहनतीने रस्ता तयार करायचा व ज्या दिवशी एस.टी. बस गावात येणार असायची त्यावेळी संपूर्ण गाव पताकांनी सजायचा. बॅण्ड पथकाच्या सहाय्याने वाजत-गाजत एस.टी.बसचे स्वागत व्हायचे. टप्याटप्प्याने ‘जिथे गाव तिथे रस्ता’ या शासनाच्या धोरणानुसार एस.टी.ची बस धावू लागली. एस.टी.ने केवळ गावच नव्हे माणसातील नातीही जोडली.
एस.टी.चा सुरु वातीचा काळ फार खडतर होता. बसगाड्यांची अवस्था फारशी बरी नव्हती. आगार-व्यवस्थापकांची कार्यालये पत्र्यांच्या शेडमध्ये असत. कार्यशाळेतील कर्मचारी पावसात व चिखलात भिजून प्रवाशांसाठी बसेस तयार करीत असत. म्हणून आज जो एस.टी.चा विस्तार झाला आहे, तो याच कर्मचाऱ्यांच्या जीवावर.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात एस.टी.चा वाटा हा सिहांचा आहे. एस.टी.बसमुळेच विद्यार्थ्यांचे शहरात येऊन पुढील शिक्षण घेणे शक्य झाले. शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एस.टी. बसनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत. त्यात खुशालीचे पत्रे व निरोपही असत. संपूर्ण ग्रामीण यंत्रणाच एस.टी.बसवर अवलंबून होती. एखादी बाळंतपणासाठी अडलेली भगिनी असो वा सर्पदंश झालेला रु ग्ण, अशा आपत्कालीन स्थितीत एस.टी.चे वाहन गावकऱ्यांच्या उपयोगी पडते. पोस्ट खात्याची टपाल सेवा, औषधांचे वितरण, वृत्तपत्रे, होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, सण-उत्सव व लग्न सराईमध्ये प्रवाशांची सुखरूप ने-आण हे सर्व एस.टीवरच अवलंबून असायची.
१९५० साली प्रवाशी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झाले व अधिकृत एस.टी महामंडळाची निर्मिती झाली. दिवसेंदिवस महामंडळ प्रगतीच्या व बदलाच्या दिशेने प्रवास करू लागले. १९५० साली २ लक्झरी बसेस नीलकमल व ग्लोरीया, रोहिणी पुणे ते महाबळेश्वर या पर्यटन मार्गावर धावू लागल्या.
 

Web Title: 68 years old, ST! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.