पुणे विद्यापीठाच्या ६८५ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By admin | Published: March 13, 2016 01:53 AM2016-03-13T01:53:34+5:302016-03-13T01:53:34+5:30
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रारंभिक केंद्र, विद्यापीठ संवाद व्यासपीठ , गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत, ई -अध्यापक साहित्य विकास व नवनिर्मिती केंद्र, सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज अशा नवनवीन
पुणे : विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रारंभिक केंद्र, विद्यापीठ संवाद व्यासपीठ , गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत, ई -अध्यापक साहित्य विकास व नवनिर्मिती केंद्र, सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज अशा नवनवीन केंद्रांची स्थापना आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने विविध योजना राबविणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६८५ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प शनिवारी मंजूर झाला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून गेलेल्या सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सदस्यांच्या उपस्थितीत शनिवारी अधिसभेचे कामकाज झाले. विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी. गायकवाड यांनी सादर केलेल्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या अर्थसंकल्पास कोणत्याही चर्चेविना एकमताने सभागृहात मंजुरी देण्यात आली. विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५०२ कोटी जमेचा असून १२९ कोटी तुटीचा आहे.
अर्थसंकल्पात बांधकामे वगळता विकासकामांच्या खर्चासाठी ५ कोटी ५४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या सेवा-सुविधा सक्षम करण्यासाठी ४ कोटी ४२ लाखांची तरतूद असून, त्यातून वसतिगृहे, ग्रंथालय, आरोग्य सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ यातील विकासकामे केली जातील. विद्यापीठ आवारातील इमारती बांधकामांसाठी एकूण ७९ कोटी ६० लाख आणि इतर बांधकांसाठी १९ कोटी ९२ लाख व इतर सुविधा- सुधारणांसाठी १० कोटी १२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यापीठातर्फे विविध धोरणांबाबत संशोधन करण्यासाठी विचार गट (थिंक टॅक) स्थापन करून मोठे कार्य केले जाणार आहे. त्यासाठी सेंट फॉर पॉलिसी स्टडीज स्थापन केले जाणार आहे. या केंद्रांतर्गत आंतरराष्ट्रीय अभ्यास प्रणालीच्या माध्यमातून राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक धोरणांबाबत कार्य केले जाणार आहे.विद्यापीठाने दत्तक घेतली गावे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे जिल्ह्यातील कोंडीवडे (वडगाव मावळ), कोळवडी (वेल्हा), अहमदनगर जिल्ह्यातील कोकणगाव (संगमनेर), आणि नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (दिंडोरी), कातुर्ली, (त्र्यंबकेश्वर) ही पाच गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०१५पासून पुढे पाच वर्षे ग्रामविकासाची कामे केली जाणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्वायत्तता या योजनेंतर्गत माईर्स महाराष्ट्र अॅकॅडमी आॅफ इंजिनिअरिंग केळगाव, या महाविद्यालयास २०१६-१७ पासून स्वायत्तता प्रदान केली आहे. तसेच कर्वेनगर येथील कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्वायत्ततेची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
> ४पुणे विद्यापीठ प्रतिष्ठित अभ्यासवृत्तीसाठी १ कोटी
४आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सहाय्यासाठी १ कोटी
४पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ३ कोटी
४राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी ३ कोटी
४संशोधक विद्यार्थ्यांच्या चर्चासत्र व प्रवासासाठी १० लाख
४स्टाफ स्कील प्रोग्रॅमसाठी १ कोटी रुपये
४इंग्रजी संभाषण कौशल्यासाठी २५ लाख
४व्हर्च्युअल क्लासरुमसाठी ५ कोटी
४स्पोर्ट कॉम्लेक्स इमारतीसाठी ५ कोटी
४विद्यार्थी सुविधा केंद्राच्या इमारत बांधकामासाठी १० लाख
४विद्यार्थी वसतीगृहासाठी २ कोटी ६७ लाख