६८७ पोलिसांना सन्मानचिन्ह
By admin | Published: April 27, 2017 01:55 AM2017-04-27T01:55:59+5:302017-04-27T01:55:59+5:30
पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) ६८७
मुंबई : पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) ६८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी विजेत्यांची नावे जाहीर केली. एक मे रोजी या पदकांचे वितरण केले जाणार आहे.
सन्मानचिन्ह विजेत्यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक संतोष रस्तोगी, मुंबईतील अप्पर आयुक्त आस्वती दोरजे, ठाण्यातील अप्पर आयुक्त यशस्वी यादव, साताऱ्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक सोहेल शर्मा आदींचा समावेश आहे. यावर्षीच्या यादीत मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ४० हून अधिक अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.
पोलीस दलात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवा बजाविणाऱ्यांना दरवर्षी एक मे रोजी महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते. केंद्राच्या पुरस्कारानंतर त्याला महत्त्व असल्याने त्याबाबत उत्सुकता असते. २०१६ या वर्षासाठी जाहीर केलेल्या ६८७ जणांमध्ये १६ अधिकारी-अंमलदार हे राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकाने सन्मानित आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतंत्रपणे ‘इनसिग्नीया’ बहाल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वर्धापनदिनादिवशी स्थानिक पोलीस घटकांमध्ये पोलीस परेडवेळी त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)