कोल्हापूरमध्ये ६९ टक्के मतदान
By Admin | Published: November 2, 2015 03:11 AM2015-11-02T03:11:00+5:302015-11-02T03:11:00+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण
कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी अपूर्व, अत्यंत चुरशीने सरासरी ६८.८२ टक्के मतदान झाले. ही निवडणूक केवळ कोल्हापूर शहरावर सत्ता कोणाची, हे ठरविणारी नसून, भविष्यातील राज्य सरकारच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. सर्वच केंद्रांबाहेर कोल्हापूरकरांनी गर्दी करून मोठ्या उत्साहाने मतदान केले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.
कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या प्रतिष्ठेची बनविली असल्याने, केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर रांगा लागल्या. शहरातील ८१ प्रभागांत ही निवडणूक होत असून, सर्व ३७८ मतदान केंद्रांवर मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले.
एक केंद्रावर सरासरी १२०० ते १४०० मतदान होते. मतदानाची प्रक्रिया संथपणे सुरू राहिल्याने गर्दी वाढली. मतदानाची गती अगदीच संथ होती, खोली क्रमांक नीट न कळल्याने वेळ खूप गेला. (प्रतिनिधी)
दुबार नावांचा घोळ कायम
शहरातील ८१ प्रभागांत दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या १७ हजार इतकी आहे. दुबार नावे कमी करण्याचा अधिकार महापालिका अधिकाऱ्यांना नसल्याने ती तशीच यादीत राहिली आहेत, परंतु ज्यांचे नाव दुबार म्हणून नोंदले गेले, त्या मतदारांना घराजवळच्या मतदान केंद्रावर आणि तेही एकाच ठिकाणी मतदान करण्यास परवानगी दिली होती, परंतु काही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षांनी अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानच करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मतदार आणि केंद्राध्यक्ष यांच्यात वाद होत राहिला. विशेषत: साळोखेनगरमधील शिवशक्ती हायस्कूलमध्ये असे प्रकार घडले.
टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अॅप
पूर्वी मतदान बूथवर मतदारांची नावे शोधण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते याद्या घेऊन बसलेले असत, परंतु या निवडणुकीत याद्यांची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली. मतदाराचे नाव शोधण्यासाठी टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अॅपचा वापर करण्यात आला.
रुईकर कॉलनीत वादावादी
दुपारी रुईकर कॉलनी येथील हिंद विद्यामंदिर केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते डोक्यावर पक्षाची टोपी व गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून गेल्यामुुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. कार्यकर्ते थेट केंद्रात घुसल्याने विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले.