सिंचन घोटाळा प्रकरणांमध्ये ७ जणांवर गुन्हे, १० निलंबित
By Admin | Published: September 4, 2016 03:38 AM2016-09-04T03:38:37+5:302016-09-04T03:38:37+5:30
राज्याच्या विविध भागांतील सिंचन प्रकल्पांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या संदर्भात शनिवारी तीन ठिकाणी कारवाया झाल्या. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी
मुंबई : राज्याच्या विविध भागांतील सिंचन प्रकल्पांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या संदर्भात शनिवारी तीन ठिकाणी कारवाया झाल्या. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी जलसंपदा विभागाच्या १० अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कोंढाणे प्रकल्पातील गैरव्यवहारांसंदर्भात शासकीय अधिकारी व कंत्राटदार असे मिळून सात जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले गेले, तर गोसीखुर्द प्रकल्पातील घोडाझरी कालव्याच्या कामातील घोटाळ्यात नागपूरच्या विशेष न्यायालयात पाच सरकारी अधिकारी व एक कंत्राटदार यांच्यासह सहा जणांवर पहिले आरोपपत्र दाखल केले गेले.
विशेष म्हणजे मुंबईचे निस्सार फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री हे ठाण्यात नोंदविलेला गुन्हा व नागपूर येथे दाखल झालेले आरोपपत्र या दोन्हींमध्ये आरोपी आहेत. ते एफ. ए. कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीचे भागीदार आहेत. घोडाझरीच्या कामात निविदेचे नियमबाह्य अद्ययावतीकरण करून खत्री यांच्या फर्मला ७.३८ कोटी रुपयांचा बेकायदा लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. तर कोंढाणे प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता व नव्याने निविदा न काढता खत्री यांना २७१ कोटी रुपयांचा वाढीव ठेका दिल्याचा गुन्हा ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी नऊ ठेकेदारांसह १५ निवृत्त व १० विद्यमान अधिकाऱ्यांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सर्व नऊ कंत्राटदारांना याआधीच काळया यादीत टाकण्यात आले होते. सेवेत असलेल्या जलसंपदा विभागाच्या १० अभियंत्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार शनिवारी निलंबित करण्यात आले. त्यांत तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. एस. मोरे, तत्कालीन उपविभागीय अभियंता आर. बी. गलियाल व व्ही. के. लोमटे, एस. एस. टिळेकर, बी. बी. ढेरे, टी. ए. देशपांडे, एस. डी. कोकाटे, जे. वाय.सूर्यवंशी, एच. के. धामणकर आणि आर. डी. पाटील या आठ तत्कालीन शाखा अभियंत्यांचा समावेश आहे.
ठाण्यात गुन्हे नोंदविलेल्यांमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता डी. पी. शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बा. भा. पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, तत्कालीन मुख्य अभियंता प्र.भा. सोनावणे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए.पा. काळुखे (सर्व सेवानिवृत्त), तत्कालीन कार्यकारी अभियंता रा. चं. रिठे (निलंबित) आणि निस्सार फतेह मोहम्मद खत्री या कंत्राटदाराचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)
तटकरेंंच्या मागेही शुक्लकाष्ठ?
कोंढाणे धरणाच्या कामाचे कंत्राट मंजूर झाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदामंत्री होते. त्यामुळे नोंदविलेल्या गुन्ह्यात त्यांचे नाव नसले तरी त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
आरोपपत्रात
यांचा समावेश
नागपूरमध्ये ज्यांच्याविरुद्ध ६,४३४ पानांचे आरोपपत्र दाखल झाले त्यांत तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता रमेश वर्धन, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे व कंत्राटदार खत्री यांचा समावेश आहे.