७ कोटीच्या मर्सिडीजचा सामान्य पोलिस गाडीसारखा वापर
By admin | Published: February 3, 2016 01:10 PM2016-02-03T13:10:54+5:302016-02-03T13:16:32+5:30
खरेदी केलेल्या वाहनांची देखभाल करणे न जमल्यामुळे या वाहनखरेदीवर झालेला कोटयावधी रुपयांचा खर्च वाया गेला. सात कोटी रुपये मोजून विकत घेतलेल्या मर्सिडीज बॉम्ब शोधक गाडीचीही अशीच अवस्था झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने मुंबईच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांची खरेदी केली. पण नंतर खरेदी केलेल्या वाहनांची देखभाल करणे न जमल्यामुळे या वाहनखरेदीवर झालेला कोटयावधी रुपयांचा खर्च वाया गेला.
सात कोटी रुपये मोजून विकत घेतलेल्या मर्सिडीज बॉम्ब शोधक गाडीचीही अशीच अवस्था झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मर्सिडीज मधल्या बॉम्ब शोधक उपकरणांच्या दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्यामुळे या गाडीचा आज सामान्य पोलिस व्हॅनसारखा वापर होत आहे.
मर्सिडीज व्हॅनची दुरुस्ती केली असली तरी, त्यातील उपकरणांचा खर्च परवडत नसल्यामुळे पोलिस दलातील अन्य गाडयांसारखा तिचा वापर होत आहे. जमिन आणि पाणी दोन्ही ठिकाणी चालू शकणा-या बोटींसारखी या गाडीची अवस्था झाली आहे.
२६/११ हल्ल्यानंतर समुद्र आणि किना-यावर गस्त घालण्यासाठी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी चालू शकणा-या या बोटी विकत घेतल्या होत्या. ही व्हॅन अनेकवर्ष वापराविना पडून होती. ऑक्टोंबर २०१५ मध्ये हिंदुस्थान टाईम्सने या व्हॅन बाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली.
२००८ मध्ये दहा पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. यावेळी या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात अनेक निरपराध ठार झाले होते.