कसबा सांगावमधील सात कुटुंबे वाळीत
By admin | Published: June 10, 2015 12:45 AM2015-06-10T00:45:41+5:302015-06-10T00:46:09+5:30
मेंढे धनगर समाज : जातपंचायतीचा मानसिक त्रास
कोल्हापूर/कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथील मेंढे धनगर समाजातील सात कुटुंबांना त्याच समाजाने वाळीत टाकले आहे. जातपंचायतीच्या जाचक अटींमुळे ही कुटुंबे मेटाकुटीला आली असून, या जाचाविरुद्ध बंड करायचे त्यांनी ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी कागलच्या तहसीलदारांची मुलाबाळांसह भेट घेऊन जातपंचायतीला पायबंद घालण्याची मागणी केली.
तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना या कुटुंबीयांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावर शंकर नारायण पुजारी, मारुती नारायण पुजारी, धनपाल आप्पाजी पुजारी, रामचंद्र नारायण पुजारी, साऊबाई रामचंद्र पुजारी, अनिल पुजारी, श्रीपती पुजारी, आदींसह १७ नागरिकांच्या सह्णा आहेत. आपल्याच समाजातील देवाप्पा बाबूराव नायकवडे, मधुकर कोण्णे, बाळू कोण्णे, निगाप्पा बटू पुजारी, बाबासो देवाप्पा नायकवडे, महादेव दौलू हजारे, विठ्ठल रामू हजारे, बाळू किसन हजारे हे लोक जातपंचायतीच्या नावाखाली आमचा छळ करत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात काही लोकांकडून जातपंचायतीच्या नावावर स्त्रिया आणि पुरुषांना नाहक त्रास दिला जात आहे. ही सात कुटुंबे २००७ पासून या गोष्टींचा त्रास सहन करत आहेत. परंतु, अलीकडच्या काळात या त्रासात वाढ झाली आहे. जातपंचायतीविरोधात महाराष्ट्रभर आवाज उठविला जात आहे. अनेक ठिकाणी अशा निष्ठूर लोकांना शिक्षाही झाली आहे. तरीही कसबा सांगावमध्ये आजही अशी वागणूक मिळते. तेव्हा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आम्हाला माणूस म्हणून जगणेही अवघड होईल. आम्ही जातपंचायतीच्या विरोधात आवाज उठविल्याने या लोकांकडून आम्हाला त्रास अथवा जीविताला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्यांना वेळीच पायबंद घालावा.