पुसद अपघातात ७ ठार
By Admin | Published: April 21, 2016 05:10 AM2016-04-21T05:10:43+5:302016-04-21T05:10:43+5:30
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना उमरखेड मार्गावरील साई मंदिरसमोर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
पुसद (यवतमाळ) : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना उमरखेड मार्गावरील साई मंदिरसमोर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच तर दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत तालुक्यातील हर्षी आणि चिलवाडीचे असून या अपघाताने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शेषराव नारायण काळे (४५), युवराज तुकाराम गुव्हाडे (२२), बाळू तुकाराम गुव्हाडे (३५), यादव साहेबराव ढाकरे (२२) सर्व रा. हर्षी, विलास राजाराम काळे (२२), खंडू सखाराम तांभारे (२१), रवी नारायण कऱ्हाळे (२३, सर्व रा. चिलवाडी ता. पुसद) अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील हर्षी येथील चौघे जण दुचाकीवरुन पुसदकडे येत होते. तर शहरालगतच्या चिलवाडी येथील तिघे जण दुचाकीने खर्षी या गावाकडे जात होते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. ट्रॅक्टर चालकानेही करकचून ब्रेक मारल्याने ट्रॅक्टरही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी अवस्थेत पडून होते. त्यांना तत्काळ पुसदच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुसद शहरात अलिकडच्या काळात झालेला हा भीषण अपघात असून ट्रॅक्टर चालकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)