विरारमध्ये ७ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 04:08 AM2016-10-17T04:08:45+5:302016-10-17T04:08:45+5:30
विरार पूर्वेकडील एका सुपरमार्केटमध्ये घुसून चोरट्यांनी ७ लाखांची रोकड लंपास केली.
विरार : विरार पूर्वेकडील एका सुपरमार्केटमध्ये घुसून चोरट्यांनी ७ लाखांची रोकड लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, दुकान मालकाने चोरट्यांना ओळखले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.
विरार पूर्वेला जीवदानीच्या पायथ्याशी असलेल्या एका सुपर मार्केटमध्ये १३ तारखेच्या रात्री दोन चोरट्यांनी दुकानामागील एक्झास फॅन तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला चोरांनी सुपर मार्केटमधील सामान चोरण्याचा प्रयत्न केला. पण दुकानात तिजोरी असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने तिजोरी फोडून ७ लाख रुपयांची रोख आणि १० ते १५ हजारांची चिल्लर लंपास केली. सुट्या असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. यामुळे मालकाने दोन दिवसांचे जमा झालेले पैसे तिजोरीत ठेवले होते. चोरांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर काढून नेले होते. मात्र, त्यांनी ते दुकानाच्या मागच्या बाजूच्या कचऱ्यात टाकून दिले होते. या सीसीटीव्ही फूटेज आधारे दुकानमालक आणि कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना ओळखले आहे. चोरटे साईनाथनगरातील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (वार्ताहर)