टोमॅटो डाळिंबावरही पडले भारी; लाडसावंगी येथे १ एकरात जवळपास सात लाखांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:05 AM2024-09-13T10:05:08+5:302024-09-13T10:06:31+5:30
लाडसावंगी येथील सुनील पवार या शेतकऱ्याने एक एकरावर खोल नांगरणी करत बेड पद्धतीने टोमॅटो लागवड केली.
जितेंद्र डेरे
लाडसावंगी (जि. छत्रपती संभाजीनगर) : येथील एका शेतकऱ्याने जून महिन्यात एक एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. ते टोमॅटो डाळिंब पिकावर भारी पडताना दिसत आहे. एकीकडे लहरी निसर्गाचा परिणाम शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत, तर नवीन शेतकरी शेतात वेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण करत आहेत.
लाडसावंगी येथील सुनील पवार या शेतकऱ्याने एक एकरावर खोल नांगरणी करत बेड पद्धतीने टोमॅटो लागवड केली. याआधी शेण खत, रासायनिक खते टाकून बेडवर ठिबक व प्लास्टिक आच्छादन केले. वेळेवर पाणी, कीटकनाशके फवारणी केली. मागील पंधरवड्यापासून आजपर्यंत तब्बल एक हजार कॅरेट टोमॅटो बाजारपेठेत विक्री केली. आणखी एक हजार कॅरेट टोमॅटो निघतील अशी अपेक्षा आहे. टोमॅटोला बाजारपेठेत वीस ते पंचवीस रुपये किलोचा दर मिळत आहे. आतापर्यंत चार लाख रुपये हाती आले, तर आणखी चार लाख रुपये येतील असे पवार यांना वाटत आहे. आजपर्यंतचा खर्च वजा जाता जवळपास सात लाखांचे उत्पन्न होईल, असे त्यांनी सांगितले.
माझ्याकडे दोन एकर डाळिंब आहे. मात्र, यंदा भाव चांगला असूनही मागील वर्षीच्या दुष्काळाने डाळिंब पिकाला पाणी टंचाईचा फटका बसला. यात दोन एकरांवर खर्च वजा जाता चार लाख हाती आले. मात्र, डाळिंबापेक्षा एक एकर टोमॅटो भारी पडले. चारशे ते सातशे रुपये कॅरेट भाव मिळत आहे. - सुनील पवार, लाडसावंगी शेतकरी