सोलापूर - आलेगाव येथे दरोडा टाकून 7 लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: August 30, 2016 02:54 PM2016-08-30T14:54:15+5:302016-08-30T14:54:15+5:30
माढा तालुक्यातील आलेगांव येथे दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकत घरातील लोकांना मारहाण केला ज्यामध्ये तीन लोक जखमी झाले आहेत
Next
>- ऑनलाइन लोकमत
टेंभुर्णी, दि. 30 - माढा तालुक्यातील आलेगांव बु येथील दादासाहेब कवडे व लक्ष्मण कदम यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून कवडे यांच्या घरातून १४ तोळे सोन्याचे दागिन्यासह ५३ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. तर कदम यांच्या घरातून ४ तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यासह ५ हजार रूपये असे एकूण १८ तोळे सोन्यासह ५८ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकुन चोरून नेला. यावेळी कवडे यांच्या घरातील महिला जाग्या असताना दरोडेखोरांनी घरात घुसून दहशत निर्माण करून चोरी केल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आलेगांव बु पासून दीड किलोमीटर अंतरावर कवडे वस्तीवर दादासाहेब हनुमंत कवडे (वय ३८), सुभाष हनुमंत कवडे (वय ३४), संतोष हनुमंत कवडे (वय ३६) हे तिघे भाऊ त्यांचे आई, वडील, लहान मुले व तिघांच्या पत्नी यांच्यासह राहतात. मंगळवारी त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने तयारीसाठी महिला पहाटेच उठून स्वयंपाक करत होत्या. शेतातील वस्ती असल्याने घराभोवती अंधार होता. पहाटे चार वाजता महिलांना वस्तीसमोरील अंगणात काही अनोळखी पुरूष दिसले, या महिलांनी घरात झोपलेल्या पुरूषांना याची माहिती देईपर्यंत दरोडेखोरांनी हल्ला चढविला.
तीन भाऊ वेगवेगळ्या खोलीत लहान मुलांबरोबर झोपले होते. दरोडेखोरांनी सुभाष कवडे यांच्या खोलीत शिरून त्याला मारहाण केली़ व खोलीतील कपाड उघडून कपाटातील सोने व रोख रक्कम घेतली. त्यानंतर चोरट्यांनी दुसरा भाऊ संतोष कवडे यांच्या खोलीत प्रवेश करून आतून दार बंद केले. यावेळी संतोष कवडे व चोरट्यांमध्ये झटापट झाली त्यामुळे चोरट्यांनी संतोष कवडे यांच्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. खोलीत शिरलेल्या दोघांनी कपाट तोडले व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेतली़ याच खोलीत असलेल्या संतोष कवडे यांच्या मुलीच्या कानातील रिंग काढून घेतली.
दरम्यान, वस्तीच्या बाहेर अगोदरच दादासाहेब कवडे यांना दरोडेखोरांनी काठीने मारहाण केली होती़ याचवेळी त्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिनेही काढून घेतले होते़ एकूण १४ तोळे सोन्याचे दागिने व ५३ हजार २०० रूपये रोख रक्कम व एक मोबाईल घेवून दरोडेखोर निघुन गेले़ दोन मोबाईल त्यांनी शेतात फेकून दिले.
यानंतर कवडे कुटुंबिय जीप करून पहाटे ४ च्या सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाले़ या घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देवून सुभाष कवडे व संतोष कवडे या जखमींना उपचारासाठी इंदापूरला पाठविण्यात आले़ सुभाष कवडे यांच्या तोंडावर व हातावर शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर इंदापूर येथील हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत़ तर संतोष कवडे यांना उपचार करून घरी सोडले आहे़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगोले हे पोलीस नाईक दत्तात्रय वजाळे, बिरूदेव पारेकर, मोहन भोसे व संदीप निचळ या कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले़ हा सर्व गोंधळ चालू असतानाच कवडे यांच्या वस्तीजवळ राहणारे लक्ष्मण कदम यांच्याही घराचे मागील दार तोडून घरात प्रवेश करून कपाटाचे दार तोडून आतील ४ तोळे सोन्याचे दागिने व कदम यांच्या भिंतीवर अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून ५ हजार रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेले होते़ लक्ष्मण कदम झोपेत असतानाच चोरट्यांनी डाव साधला होता़ आपली चोरी झाल्याचे कदम यांना सकाळी उठल्यावर कळाले.
या घटनेची माहिती मिळताच व या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी दुपारी आलेगाव येथे घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी हे घटनास्थळावर तळ ठोकून असून सविस्तर माहिती घेवून तपासाची दिशा ठरवित आहेत़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनीही घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली़ याचबरोबर श्वान पथकाच्या माध्यमातूनही तपास सुरू आहे़ दरोडेखोर हे मराठी बोलत होते़ त्यांनी हाफ पॅन्ट व टी शर्ट, जर्कीन घातले होते़ तोंडाला हातरूमाल बांधले होते़ टी शर्टच्या मागे जगदंब लिहिले होते़.