32 लाखांचं बक्षीस असलेल्या सात जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 07:30 PM2019-01-05T19:30:55+5:302019-01-05T19:34:01+5:30

तीन महिला व चार पुरूषांचा समावेश

7 naxals carrying Rs 32 lakh reward surrenders in gadchiroli | 32 लाखांचं बक्षीस असलेल्या सात जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

32 लाखांचं बक्षीस असलेल्या सात जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

Next

गडचिरोली : नक्षल चळवळीला कंटाळून सात जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सातही जणांवर एकूण ३१ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. 

विकास ऊर्फ साधू पोदाळी (२७), वैशाली बाबुराव वेलादी (१८), सूरज ऊर्फ आकाश ऊर्फ धनातू तानू हुर्रा (२५), मोहन ऊर्फ दुलसा केसा कोवसी (१९), नवीन ऊर्फ अशोक पेका (२५), जन्नी ऊर्फ कविता हेवडा धुर्वा (२६), रत्तो ऊर्फ जनीला ऊर्फ दुर्गी गेबा पुंगाटी (२९) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. 




विकास पोदाळी हा फेब्रुवारी २०१३ मध्ये बिनागुंडा सीएनएम टीममध्ये सहभागी झाला. तो मार्च २०१४ पासून छत्तीसगड राज्यातील कोडेलयेर येथे जनमिलिशिया दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. वैशाली वेलादी ही जानेवारी २०१५ मध्ये राही दलममध्ये सहभागी झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये ती कार्यरत होती. तिच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. सूरज हुर्रा हा फेब्रुवारी २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सर्वप्रथम सहभागी झाला. एप्रिल २०११ ते एप्रिल २०१३ पर्यंत धानोरा दलममध्ये कार्यरत होता. मे २०१३ मध्ये पुन्हा टिपागड दलममध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आले. त्याचवर्षी त्याला पीपीसीएम म्हणून पदोन्नती देण्यात आली. तो जानेवारी २०१७ पर्यंत कसनसूर अ‍ॅक्शन टीममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर १३ चकमक, पाच खून, तीन भूसुरूंग स्फोट आणि एक जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. मोहन कोवसी हा जून २०१५ मध्ये पेरमिली दलममध्ये सहभागी झाला. ऑगस्ट २०१५ मध्ये त्याची पेरमिली दलममधून सिरोंचा दलममध्ये बदली झाली. फेब्रुवारी २०१७ पर्यंत तो सिरोंचा दलम डीव्हीसी रघू याचा गार्ड म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दोन चकमक व एक खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. 

नवीन टेका हा फेब्रुवारी २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाला. एप्रिल २०१२ मध्ये त्याची सिरोंचा दलममध्ये बदली झाली. २०१४ पर्यंत तो सिरोंचा दलममध्ये डीव्हीसी श्रीनू याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. २०१५ मध्ये त्याला उपकमांडर पदावर पदोन्नती देण्यात आली. तो २०१७ पर्यंत गट्टा दलम उपकमांडर म्हणून कार्यरत होता. एप्रिल २०१७ मध्ये पेरमिली दलममधून पुन्हा गट्टा दलममध्ये त्याची बदली झाली. त्याच्यावर पाच चकमक, दोन हमले, एक स्फोट, सहा खून, एक अपहरण, दोन जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. 

जन्नी धुर्वा ही जून २०१० मध्ये भामरागड दलममध्ये सहभागी झाली. डिसेंबर २०१० मध्ये तिला सेक्शन कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली. तिच्यावर सात चकमक, दोन जाळपोळ, तीन खून, एक भूसुरूंग स्फोट असे गुन्हे आहेत. शासनाने पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सत्तो पुंगाटी ही ऑक्टोबर २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये सहभागी झाली. डिसेंबर २०१८ पर्यंत ती टिपागड दलममध्ये एसीएएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर पाच लाख रूपयांचे बक्षीस होते. 

सात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी, डॉ.मोहित गर्ग उपस्थित होते.

Web Title: 7 naxals carrying Rs 32 lakh reward surrenders in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.