पेट्रोलमध्ये जिरणार ७ टक्के इथेनॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:36 AM2019-04-11T06:36:14+5:302019-04-11T06:36:27+5:30
महाराष्ट्र अग्रेसर; ८६ कोटी लिटरचा होणार पुरवठा
पुणे : देशात यंदा प्रथमच सात टक्के इथेनॉल पेट्रोलमधे जिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती उद्योगांनी देशातील आॅईल कंपन्यांशी तब्बल २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. त्यापैकी ७५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देखील केला आहे. देशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ८६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होईल.
देशाने २०१८ साली बायो फ्युएल पॉलिसी स्वीकारली. त्यानुसार २०३० पर्यंत इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा संकल्प आहे. देशातील इंधनाचा खप लक्षात घेता दहा टक्के इथेनॉल मिश्रण करायचे झाल्यास ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यंदा २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यात यश आल्यास, ७ टक्के इथेनॉल मिश्रण शक्य होईल, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.
राज्यातून ८६ कोटी लिटर इथेनॉल
महाराष्ट्रातून ८६ कोटी इथेनॉलचा पुरवठा होईल. त्यातील ४२ कोटी लिटर इथेनॉलचे राज्यातील इंधानामध्ये मिश्रण होईल. उवर्रित ४४ कोटी इथेनॉल दुसऱ्या राज्यात पाठविले जाईल. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ९ टक्के इथेनॉलचे मिश्रण झाले झाले आहे.
देशभरातून २३७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठ्याचे करार करण्यात आाले असून, त्यातील ४५ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून होईल. १६.५ कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यातून उत्पादित करण्यात येणार आहे.
कारखान्यांना सुरळीत पत पुरवठा होण्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ