महिला प्रवाशांसाठी ७० बस

By Admin | Published: March 7, 2017 12:55 AM2017-03-07T00:55:35+5:302017-03-07T00:55:35+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिलांची लवकरच सुटका होणार आहे.

70 bus for women passengers | महिला प्रवाशांसाठी ७० बस

महिला प्रवाशांसाठी ७० बस

googlenewsNext


पुणे : नोकरी-व्यवसायासाठी बसने प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसमुळे होणाऱ्या त्रासापासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिलांची लवकरच सुटका होणार आहे. राज्य सरकारने खास महिलांसाठी तेजस्विनी बस सेवेअंतर्गत पुण्याला ७० बस देण्याला हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारकडून या बसेसचा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, लवकरच बस खरेदीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पुण्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जानेवारी महिन्यात या सेवेसाठी पुण्याचाही समावेश करण्यात आला. या शहरांसाठी प्रत्येकी ५० बस राज्य सरकारच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहेत. महिलांची सुरक्षितता व सुखद प्रवासासाठी सरकारकडून खास महिलांसाठी तेजस्विनी सेवा सुरू करण्यासाठी सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. संबंधित पालिका किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनाने बस खरेदी व संचलनाची प्रक्रिया राबवायची आहे.
या बसेसबाबत राज्य सरकारने संबंधित शहरांतील सार्वजनिक वाहतूक संस्थेकडून अहवाल मागविले होते. ‘पीएमपी’ने या अहवालामध्ये तेजस्विनी सेवेसाठी १०० मिनी बसेसची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारकडून सुरुवातीला ५० बसेस देण्याचेच मान्य करण्यात आले होते. ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांची संख्येच्या आधारे अधिकच्या बसेसची गरज पटवून दिली. त्यामुळे ७० बसेस देण्याला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. ‘पीएमपी’चे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यांनीही याला दुजोरा दिला आहे. ‘राज्य सरकारकडे १०० बसेसची मागणी करण्यात आली होती. मात्र, ७० बसेसला मान्यता मिळाल्याचे समजले आहे. अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. हे पत्र मिळाल्यानंतर बस खरेदीची प्रक्रिया सुरू होईल,’ असे मोरे यांनी सांगितले.
>राज्य सरकारतर्फे महिलांसाठी पाच महापालिकेत तेजस्विनी सेवा
राज्य सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जानेवारी महिन्यात पुण्याचाही समावेश करण्यात आला.
>या बस प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा, हडपसर या प्रमुख स्थानकातून सोडण्याचे प्रस्तावित आहे. माळवाडी, धायरी, वाघोली, कोथरूड डेपो, निगडी, भोसरी, चिंचवडगाव, हिंजवडी, विश्रांतवाडी यांसह अन्य काही मार्गांवर बस सुरू केल्या जातील. या मार्गांवरील गर्दीच्या वेळा निश्चित करून त्यानुसार बसेसची वारंवारता ठरविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
>२० ते २५ मार्गांवर धावेल तेजस्विनी
‘पीएमपी’कडून सध्या खास महिलांसाठी चार ते पाच मार्गांवर गर्दीच्या वेळी बस सोडल्या जातात. शिवाजीनगर ते कात्रज, कात्रज ते हौसिंग बोर्ड, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते मनपा या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी बस सोडली जाते. काही वर्षांपूर्वी केवळ महिलांसाठीच काही मार्गांवर दिवसभर बसच्या फेऱ्या सुरू असायच्या. मात्र, महिलांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा केवळ गर्दीच्या वेळी सुरू ठेवण्यात आली. आता राज्य शासनाकडून ७० बस मिळणार असल्याने महिलांसाठी अधिक बस उपलब्ध होणार आहेत. या बस पुणे व पिंपरी चिंचवडमधील २० ते २५ मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन आहे.
>तेजस्विनी बस सकाळी ७ ते ११ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत गर्दीच्या वेळी सोडल्या जातील. या बसेसमधील सर्व आसने महिलांसाठीच राखीव असतील. सुरक्षेच्यादृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही असणे बंधनकारक आहे.बसेसमध्ये प्रामुख्याने महिला चालक व वाहक असतील. स्थानिक परिस्थितीनुसार तिकीटदर व वेळा ठरविण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे.
>राज्य सरकारकडे १०० बसेसची मागणी करण्यात आली होती.
>70
बसेसला मान्यता
राज्य सरकारकडून या बसेससाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Web Title: 70 bus for women passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.