सहा महिन्यांत ७0 बळी
By Admin | Published: June 6, 2016 01:34 AM2016-06-06T01:34:21+5:302016-06-06T01:34:21+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास २५0 जण जखमी झाले आहेत. रविवारी शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग तयार करण्यात आला. २00२ मध्ये ९४.५ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील चौदा वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे २00२ ते २0१२ या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल १७५८ अपघात घडले होते. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या सत्तरच्या घरात गेली आहे, तर जवळपास अडीचशे जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महिंद्रा आणि महिंद्रा लि. तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात फेब्रुवारी २0१६ मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकत्रित सहकार्यातून पुढील तीन-चार वर्षांत महामार्गावरील अपघातांत मृतांची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.
अपघातांचा तपशील
२९ एप्रिल २0१६ : खोपोली एक्झिट वळणावर कंटेनरची मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप व्हॅनला धडक, २ जण ठार
१७ मार्च २0१६ : महामार्गावरील अडोशीजवळ खासगी बसची दुभाजकाला धडक, २ ठार, १५ जण जखमी
१६ मे २0१६ : भरधाव एसटी बसची झाडाला धडक. दुपारी पावणे तीनची घटना. १५ प्रवासी जखमी
२ जून २0१६ : भरधाव कारची रस्ता दुभाजकाला धडक, ३ ठार, तीन जखमी. अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील ठाणे येथील रहिवासी होते.
२ जून २0१६ : खासगी लक्झरी बसची ट्रकला धडक, पहाटे घडलेल्या या अपघातात ५ ठार, १६ जखमी
५ जून २0१६ : महामार्गावरील शिवकर गावाजवळ लक्झरी बसची स्विफ्ट आणि इनोव्हा गाडीला धडक, १७ मृत, ४७ जखमी.