लग्नातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, कढोली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 11:25 PM2021-02-17T23:25:17+5:302021-02-17T23:25:59+5:30
Jaigoan : कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.
जळगाव : कढोली ता. एरंडोल येथे एका लग्न समारंभातील जेवणावळीतून गावातील ६० ते ७० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी
सायंकाळी घडला आहे. यामध्ये पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन जण गंभीर आहेत.
सायंकाळच्या सुमारास आरोग्य उपकेंद्रात रुग्णाची रांग लागली होती. कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली. हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना कळविला. त्यांनी तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती दिली.
रिंगणगाव येथून सहा डॉक्टर व दहा परिचारिका यांचे पथक दाखल झाले. त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांनी दिली.