राज्यात दोन महिन्यांत पोलिसांची ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:00 AM2024-08-23T05:00:09+5:302024-08-23T05:05:02+5:30
निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण स्पटेंबर अखेरीस सुरू होऊ शकणार असल्याचेही राजाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. २०२२ - २०२३ वर्षातील १७ हजार ४७१ शिपायांची रिक्त पदे भरण्यासाठी यावर्षी १९ जून पासून मैदानी चाचण्या सुरू झाल्या. त्यात ११ हजार ९५६ पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना नियुक्ती पत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण स्पटेंबर अखेरीस सुरू होऊ शकणार असल्याचेही राजाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.
राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पोलीस शिपाई ९,५९५, चालक पोलीस शिपाई १,६८६ बॅण्डस्मन ४१, सशस्त्र पोलीस शिपाई- ४,३४९ पदे, कारागृह शिपाई १,८०० पदे असे एकूण १७,४७१ पदे भरण्याकरीता जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी एकूण १६ लाख ८८ हजार ७८५ उमेदवारांचे अर्ज झाले होते. १९ जून २०२४ पासून मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली.
पोलीस शिपाई पदापैकी निवडपात्र ७,०२३ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. फक्त मुंबई शहराची मैदानी चाचणी सुरु आहे. चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण १,६८६ पदांकरिता २६ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी २४ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरु आहे. बॅण्डस्मनपैकी १७ उमेदवारांची निवड झाली आहे.
राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ गटामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व टिकाणी ४,३४९ निवडपात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. कारागृह शिपाई यांची १,८०० पदांकरिता ४ घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. अशाप्रकारे एकूण १७,४७१ रिक्त पदांपैकी ११,९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरु आहे व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकरच हजर होतील असेही व्हटकर यांनी सांगितले.