धक्कादायक ! गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भागाकारात कच्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:41 PM2018-09-20T23:41:16+5:302018-09-21T10:35:48+5:30
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने घेण्यात आलेल्या अध्यनस्तर निश्चितीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ७० टक्के भागाकारात तर ६० टक्के विद्यार्थी गुणाकारात कच्चे आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने घेण्यात आलेल्या अध्यनस्तर निश्चितीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ७० टक्के भागाकारात तर ६० टक्के विद्यार्थी गुणाकारात कच्चे आढळले आहेत. शिक्षक या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करून अध्यापन करीत आहेत.
शाळेच्या वतीने दर महिन्याला चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये सामुहिक स्वरूपाचे प्रश्न राहत असल्याने विद्यार्थी नेमका कोणत्या कौशल्यात मागे आहे, हे कळत नाही. त्यामुळे शिक्षकालाही त्यानुसार अध्यापन करणे शक्य होत नाही. परिणामी विद्यार्थी एखाद्या कौशल्यात मागे पडत जातो. ही बाब लक्षात आल्यानंतर विशिष्ट कौशल्याचे चाचणी घेतली जात आहे. याला अध्ययनस्तर निश्चित, असे संबोधले जाते. सदर चाचणी सर्व शाळांना आवश्यक करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात.
जुलै महिन्यात पहिली अध्ययनस्तर निश्चिती घेण्यात आली. याचा निकाल घोषीत करण्यात आला आहे. यामध्ये भागाकारात सर्वाधिक ७० टक्के विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले आहे. त्यातही तिसऱ्या व चवथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा भागाकार अतिशय कच्चा आहे. तिसºया व चवथ्या वर्गाच्या १० टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाच्या अध्ययन पातळीप्रमाणे भागाकार येतो. उर्वरित ९० टक्के विद्यार्थी भागाकारात कच्चे असल्याचे आढळून आले आहे. गुन्हाकाराबाबतही हिच स्थिती आहे. तिसरी व चवथीच्या केवळ २१ टक्के विद्यार्थी गुणाकारात पक्के आहेत. पाचवीचे ५२ टक्के, सहावीचे ५९ टक्के, सातवीचे ६१ टक्के तर आठवीचे ६२ टक्के विद्यार्थी गुणाकारात पक्के आहेत. त्याचबरोबर अंक ओळखण्यात १६ टक्के, संख्या ज्ञानात १९ टक्के, बेरजेत २४ टक्के, वजाबाकीत ३४ टक्के विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले आहे.
मराठी विषयामध्ये १३ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान नाही. १७ टक्के विद्यार्थी शब्दवाचन, ६७ टक्के विद्यार्थी वाक्यवाचन तर ५० टक्के विद्यार्थी समजपूर्वक वाचनात मागे असल्याचे आढळून आले आहेत. गणित विषयापेक्षा मराठीची स्थिती थोडी चांगली असली तरी १०० टक्के विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाच्या अध्ययन पातळीपर्यंत आणण्यासाठी शिक्षक तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेला मेहनत घ्यावी लागणार आहे.
जिल्हाभरातील जिल्हा परिषद व इतर संस्थांच्या सर्व १९२५ शाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १ लाख ३ हजार २४१ विद्यार्थ्यांपैकी ९९ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
विशेषतज्ज्ञांची टीम कार्यरत
ज्या कौशल्यात विद्यार्थी मागे आहे, त्या कौशल्यावर विशेष भर देऊन संबंधित शिक्षक अध्यापन करून त्यांना इतर प्रगत विद्यार्थ्यांबरोबर आणण्याचा प्रयत्न करतात. यातही शिक्षक कमी पडल्यास प्रत्येक केंद्रस्तरावर समुहक संसाधन गटाच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाभरात मराठी, गणित, विज्ञान, सामजिक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान या प्रत्येक विषयांचे प्रत्येकी १०३ असे एकूण ६१८ तज्ज्ञ आहे. सदर तज्ज्ञ संबंधित शिक्षक व विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात. तालुकास्तरावर बीआरजीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील सहा विषयांचे सहा शिक्षक, सहा साधन व्यक्ती व दोन विशेषतज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर डीआरजी तर राज्यस्तरावर एमआरजी तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. ही सर्व टीम विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
गणिताच्या तुलनेत मराठीची स्थिती उत्तम
अध्ययन स्तर निश्चितीदरम्यान मराठी व गणित या दोन विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही विषयांची निकालाची तुलना केल्यास गणिताच्या तुलनेत मराठीची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येते. ८७ टक्के विद्यार्थ्यांना भाषण, संभाषण कौशल्य अवगत आहे. ८३ टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचन, ६७ टक्के विद्यार्थ्यांना वाक्य वाचन तर ५० टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन करता येते. गणितामध्ये ८४ टक्के विद्यार्थ्यांना अंकाची ओळख आहे. ८१ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान आहे. ७६ टक्के विद्यार्थ्यांना बेरीज, ६६ टक्के विद्यार्क्यांना वजाबाकी, ४० टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार, ३० टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येते.