दररोज ७० हजार लीटर मोफत पाणी...
By admin | Published: April 27, 2016 03:44 AM2016-04-27T03:44:55+5:302016-04-27T03:44:55+5:30
कौसा परिसरात सध्या पाणीटंचाईवर विविध प्रकारचे राजकारण सुरू आहे.
कुमार बडदे, मुंब्रा
मुंब्रा-कौसा परिसरात सध्या पाणीटंचाईवर विविध प्रकारचे राजकारण सुरू आहे. यासाठी उपोषण, घेराव, मोर्चे आदी प्रकार मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने सुरू आहेत. याच वेळी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता एका खाजगी जागेवर बोअरवेल खोदून त्यातून दररोज तब्बल ७० हजार लीटर पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत असल्याची सुखद घटना समोर आली आहे.
येथील प्रभाग क्र मांक ६३ मधील कौसा भागातील चर्णीपाडा परिसरातील फारूक ढोले यांनी त्यांच्या खाजगी जागेवर स्वखर्चाने बोअरवेल खोदली. त्यामधून तेथील सैनिकनगर,चर्णीपाडा, मोतीबाग, रशीद कम्पाउंड आदी परिसरांतील २०० कुटुंबांना दररोज सरासरी ३५० लीटर याप्रमाणे ७० हजार लीटर मोफत पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. बोअरवेलमधून पाणी खेचण्यासाठी मोटारसाठी लागणारा विजेचा खर्चदेखील पाणीवाटपाचे संचलन करणारे मोहरम कमिटीचे सदस्य करत असल्याची माहिती अली पटणी या कमिटी सदस्याने दिली. पाणीकपातीच्या अडीच दिवसांमध्ये मुंब्रा-कौसा भागातील अनेक भागांतील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतात. परंतु, या बोअरवेलमुळे पाणीकपातीच्या दिवसांमध्येदेखील या भागातील नागरिकांना पर्याप्त प्रमाणात पाणी मिळते, असे त्यांनी सांगितले.