७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत पूर्ण केला

By admin | Published: February 12, 2017 08:43 PM2017-02-12T20:43:10+5:302017-02-12T20:43:10+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

The 70-year backlog completed in two and a half years | ७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत पूर्ण केला

७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत पूर्ण केला

Next

ऑनलाइन लोकमत
नरसीफाटा (नांदेड), दि. 12 - केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. गत ७० वर्षांत झाली नाहीत इतकी कामे अडीच वर्षांत पूर्ण करत विकासाचा अनुशेष भरून काढल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नरसीफाटा येथे आयोजित जाहीर सभेत केले.
नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ नरसीफाटा (ता. नायगाव) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. मंचावर माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आ. तुषार राठोड, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रावण पाटील भिलंवडे, बालाजी बच्चेवार, जिल्हा चिटणीस राजू गंदीगुडे, उमेदवार माणिकराव लोहगावे, मीनलताई खतगावकर, लक्ष्मण ठक्करवाड आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपा सरकार सत्तेत आले, तेव्हा राज्यात दुष्काळामुळे भयावह स्थिती होती. तिजोरीत एक रूपया नसताना आम्ही दुष्काळावर मात करत शेतकऱ्यांसाठी १७ हजार कोटी रुपयांच्या उपाययोजना केल्या. महाराष्ट्रातील २० हजार गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेऊन ही योजना शेतकरी, शेतमजूर यांच्या मदतीने पूर्ण केली. यातून २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली़ यापूर्वीच्या सरकारने जलसिंचनावर राज्यात ७० हजार कोटी खर्च केले. मात्र यातून पाण्याचा एक थेंब अडवता आला नाही, असे म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प मागील सरकार पूर्ण करू शकले नाही. पण मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जातील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना विजेसाठी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यातून जून २०१७ नंतर शेतातील विद्युत पंपासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. काँग्रेसने गोरगरिबांसाठी दहा वर्षांत जेवढी घरे उपलब्ध करून दिली. त्यापेक्षा जास्त घरे आम्ही सत्तेवर आल्यापासून उपलब्ध करून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ पर्यंत राज्यात एकही माणूस घराविना राहणार नाही. पूर्वी बँका श्रीमंतालाच कर्ज देत; पण आमच्या आदेशाने राज्यातील एक कोटी गरिबांना बँकेतून कर्ज मिळाले आहे.

विकास निधी देताना स्थानिक पातळीवर सत्ता कुणाची, असा विचार कधीच केला नाही. जिल्हा परिषदेसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. निधी वाटपात दुजाभाव केला नाही. याउलट यापूर्वीच्या सरकारने ७० वर्षांत काय केले याचा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
>मराठा आरक्षणावरून सभेत घोषणा
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना मराठा आरक्षणाचे काय झाले म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला़ त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहत बसा बसा, मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देणार आहोत, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली़ सभेत घोषणाबाजी करणाऱ्या गुलाबराव जाधव, दशरथ कपाटे, सतीश पाटील पवार, किरण पाटील दिघळीकर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: The 70-year backlog completed in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.