ब्रेकिंग! पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; कृषीमंत्र्यांची संसदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:17 PM2021-07-27T18:17:36+5:302021-07-27T22:44:22+5:30
पुराचा प्रचंड फटका बसलेल्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत जाहीर
नवी दिल्ली: गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारनं एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन मोदी सरकारनं राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच अधिवेशनात विरोधकांनी पेगॅसस प्रोजेक्ट अहवालावरून जोरदार घोषणाबाजी केली. आजही लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू होता. याच अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. केंद्रानं राज्याला ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी ३ हजार ७२१ कोटींची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेऊन ४ हजार ३७५ कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केलं. राज्यानं केलेल्या ३ हजार ७२१ कोटी रुपयांच्या मागणीपैकी ७०० कोटी रुपये मदत देण्याचं आज केंद्र शासनानं घोषित केलं आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.