रोज ७०० ते ८०० फोन, जिवे मारण्याची धमकी, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ; दमानियांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:06 IST2025-01-06T14:06:08+5:302025-01-06T14:06:46+5:30
माझी सुरक्षा काढा अन् अंजली दमानिया यांना सुरक्षा द्या असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

रोज ७०० ते ८०० फोन, जिवे मारण्याची धमकी, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ; दमानियांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह थेट धनंजय मुंडेंवर टीका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.
बीड जिल्ह्यातून मला अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे नावाची व्यक्ती मला फोन करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत आहे. गेल्या चार दिवसांपासून मला सातशे ते आठशे लोकांचे फोन येऊन गेले, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
नरेंद्र सांगळे यांनी माझा फोननंबर फेसबुकवर टाकला असून, काही पोस्ट केल्या आहेत. त्यांनी खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड यांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.
‘विधान समाजाविरोधात नव्हते...’
दमानिया म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधाने केली होती. बीडमध्ये वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असे मला अभ्यासातून समजले होते. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आले होते. काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये आणण्यात आले. हे विधान कुठेही समाजाविरोधात नव्हते.
माझी सुरक्षा काढा अन् दमानियांना सुरक्षा द्या : सुळे
अंजली दमानिया अनेक वेळा अनेक प्रश्नांसाठी लढलेल्या आहेत. त्यांना जर असे फोन येत असतील तर तातडीने त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. एकवेळ माझी काढून घ्या, कारण पत्रकार परिषदेत त्यांनी जे सांगितले आहे ते चिंताजनक आहे, असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तक्रारीवर योग्य पावले उचलू : मुख्यमंत्री
अंजली दमानिया यांची जी काही तक्रार असेल, ती त्यांनी पोलिसांकडे करावी. त्यावर योग्य पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.