मुंबई विद्यापीठाचे७० हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत! आठ निकाल बाकी : निकाल गोंधळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:09 AM2017-09-12T05:09:48+5:302017-09-12T05:10:15+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. तर २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होऊनही राखीव ठेवल्याने त्यांना मिळालेले नाहीत. दुसरीकडे लवकरात लवकर निकाल जाहीर करू, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी जाहीर केले आहे.
महिनाभरापासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर आहे. या टीमला मंगळवारी कारभार हाती घेऊन एक महिना झाल्याने कामाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, प्र-कुलगुरू धीरेन पटेल, विशेष अधिकारी विनायक दळवी, उपकुलसचिव दीपक वसावे उपस्थित होते.
बीएच्या परीक्षांच्या पेपर तपासणीचे काय?
मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल अद्याप जाहीर झाले नसतानाही विद्यापीठाने द्वितीय सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पण, या परीक्षांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने होणार की नाही, याविषयी अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.
बीए पाचव्या सत्राच्या परीक्षा या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २२ नोव्हेंबर, बीएससी पाचव्या सत्राच्या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २७ नोव्हेंबर, तर बीकॉम पाचव्या सत्राच्या २० नोव्हेंबर आणि सहाव्या सत्राच्या परीक्षा या १५ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. पण, आता आॅनलाइन मूल्यांकनासाठी विद्यार्थी संघटना तयार नाहीत. विद्यार्थी संघटनांनी या पद्धतीला कडाडून विरोध केला आहे.
लवकरच निकाल जाहीर करणार
क्यूआर कोडवरून उत्तरपत्रिका ठेवताना गठ्ठा बदलला गेला किंवा स्कॅनिंग करताना दुसºया ठिकाणी झाला यामुळे उत्तरपत्रिका इतरत्र गेल्या आहेत. पण त्यांचा शोध घेऊन लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.
विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत प्रभारी कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले, पदभार स्वीकारला तेव्हा १८० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नव्हते. त्यानंतर गेल्या एका महिन्यात म्हणजे कामाच्या २० दिवसांत तब्बल १७२ निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत आहे. विद्यार्थ्यांवर आलेले दडपण लक्षात घेऊन निकाल आता लवकरात लवकर जाहीर
करण्यात येतील.
३५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी
आता विद्यापीठाचे एकूण ८ निकाल शिल्लक आहेत. यापैकी ४ निकाल हे नियमित वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे तर, ४ निकाल हे वाणिज्यच्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे आहेत. मुंबई विद्यापीठाच्या १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ६४ हजार ६०४ उत्तरपत्रिकांची तपासणी अन्य विद्यापीठांनी केली आहे. १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ३५ हजार १८८ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.
पुनर्मूल्यांकनाचे निकालही लवकरच
जाहीर झालेल्या निकालापैकी आतापर्यंत २२ हजार २७५ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत जाहीर केले जातील. बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन २ हजार ६३० परदेशात जाणाºया विद्यार्थ्यांना निकाल दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले.