७/११ बॉम्बस्फोटांचा आज होणार फैसला
By admin | Published: September 11, 2015 03:23 AM2015-09-11T03:23:14+5:302015-09-11T03:23:14+5:30
मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते.
मुंबई: मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना अटक केली आहे. नऊ वर्षांनंतर याचा निकाल जाहीर होणार असल्याने या आरोपींना न्यायालय काय शिक्षा ठोठावणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट खाररोड-सांताक्रुझ, वांद्रे-खाररोड, जोगेश्वरी-माहिम, मीरारोड-भार्इंदर, माटुंगा-माहिम व बोरीवली येथे झाले होते. याप्रकरणी अतिरेकीविरोधी पथकाने कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी,शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान या आरोपींना अटक केली.
या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१० मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर याचा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच जवळपास साडेपाच हजार पानांचा पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात याची सुनावणी पूर्ण
झाली. (प्रतिनिधी)