७२ कोटींचे इफेड्रीन समुद्रात फेकले!
By admin | Published: April 29, 2016 02:34 AM2016-04-29T02:34:45+5:302016-04-29T07:13:53+5:30
सुमारे ७२ कोटींचे १८० किलो इफेड्रीन उरणजवळच्या समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जितेंद्र कालेकर,
ठाणे-सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड’ कंपनीवर ठाणे पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर हरदीप गिल आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे ७२ कोटींचे १८० किलो इफेड्रीन उरणजवळच्या समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामीची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा या संपूर्ण प्रकरणात कितपत सहभाग आहे, याची चाचपणी सुरु असून तिचीही चौकशी होणार आहे.
ठाणे पोलिसांनी १४ एप्रिलला सोलापूरच्या कंपनीवर धाड टाकून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी यांना अटक केली. त्याची माहिती मिळताच शिपिंग कंपनीचा क्रेडिट अॅण्ड फॉरवर्डींग मॅनेजर हरदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे इफेड्रीन समुद्रात नष्ट केले.
इफेड्रीनच्या तस्करीच्या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार पुनित श्रींगीने परदेशात पाठविण्यासाठी शिपिंग कंपनीचा संचालक सुब्रमण्यमकडे १८० किलो इफेड्रीन दिले होते. सुब्रमण्यमने हा माल नवी मुंबईतील हरदीपकडे दिला होता. त्याने तो त्याच्या गाडीत ठेवला होता. माल परदेशात पाठविण्याची तयारीही पूर्ण झाली होती. परंतु सोलापूरच्या कंपनीत पोलिसांचे धाडसत्र सुरू झाल्याने त्यांचा
डाव फसला.
सुमारे दोन टन अमली पदार्थ यापूर्वी परेदशात पाठविल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर हरदीपची आणखी एक कार नवी मुंबई परिसरातून पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने जप्त
केली आहे.
धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना ठाणे जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश
दिले आहेत.
>नव्याने धाडसत्र
पुनितच्या विरार आणि मुंबई तसेच हरदीपच्या नवी मुंबईच्या घरात ठाणे पोलिसांनी धाडसत्र राबविले. रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते.
कारवाईचा तपशील सांगणे उचित होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुनितच्या घरी त्याचे वडील होते. तर त्याची आई आणि भाऊ हे दुसरीकडे वास्तव्याला आहेत.
>तपासाला नवे वळण
अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी यांचा घटस्फोट झालेला आहे. मात्र पोलीस तपासामध्ये नाव आल्याने तिचीही चौकशी करणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.
विकी गोस्वामीबरोबर आरोपींच्या केनियामध्ये बैठका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक चौकशीत तरी ममता कुलकर्णीशी या आरोपींचा काही संबंध आला नसल्याचे सिंग यांनी सांगितले.