संघाचा ७२ सूत्री कार्यक्रम
By admin | Published: May 17, 2015 01:13 AM2015-05-17T01:13:58+5:302015-05-17T01:13:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरील आपले ‘कंट्रोल’ सुटू नये याची पूर्ण काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेतली जात आहे.
भागवत-शहा भेट : ४३ सूचनांवर एकमत, २९ मुद्यांवर मतभेद
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरील आपले ‘कंट्रोल’ सुटू नये याची पूर्ण काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेतली जात आहे. संघाची मोदी सरकारसोबत सातत्याने चर्चाही सुरू आहे. संघाने विविध आर्थिक विषयांचा समावेश असलेली ७२ मुद्यांची यादी मोदी सरकारला सोपविली असून यापैकी ४३ विषयांवर संघ व सरकारमध्ये एकमतही झाले आहे. मात्र, अजूनही २९ मुद्यांवर मतभेद कायम आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असता भागवत यांनी मतभेद असलेल्या २९ मुद्यांवर आपली परखड भूमिका मांडली. संघाने शहांना कुरवाळलेही आणि काय करावे, याबाबत डोसही पाजले. शहा यांनी तब्बल दोन तास मोहन भागवत यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या वेळी संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत संघातर्फे विविध सूचना मांडण्यात आल्या. भूमी अधिग्रहण कायदा, थेट विदेशी गुंतवणूक या विषयांवर संघ पूर्णपणे मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. संघाने वेळोवेळी या विषयावर आपले मत सरकारच्या प्रतिनिधींकडे मांडले आहे. भूमी अधिग्रहण कायद्यात सामाजिक मूल्यांकनाच्या मुद्यावर संघ आग्रही असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत यांनी शहा यांना या मुद्यावर सरकारची प्रतिमा जपण्याचा व नागरिकांचा कमीत कमी रोष ओढवून घेण्याचा सल्ला दिला.
शहा सायंकाळी विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. यानंतर भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्ता संमेलनात बोलताना दत्तात्रय होसबळे यांनी संघ व मोदी सरकार यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सूतोवाच करीत संघ मोदी सरकारच्या एकूणच कारभारावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे संकेत दिले. या मेळाव्यात होसबळे म्हणाले, केंद्रात सत्तापरिवर्तनानंतर या एक वर्षात सर्वकाही बदलले असे नाही, मात्र, परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सर्व बाबतीत आम्ही समाधानी नाही; पण कामाची दिशा बरोबर आहे, असेही ते म्हणाले.
एफडीआयबाबत जे काही
समोर आले त्यानंतर आपण स्वत: निर्मला सीतारामन यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले, असेही त्यांनी सांगितले.
च्गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूर येथे येऊन भागवत यांची भेट घेतली. रविवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर संघ मुख्यालयात जाणार आहेत.
च्भागवत यांनी शहा यांना या मुद्यावर सरकारची प्रतिमा जपण्याचा व नागरिकांचा कमीत कमी रोष ओढवून घेण्याचा सल्ला दिला.
रस्त्यावर उतरण्यापूर्वी संघाकडे या !
च्कोणत्याही प्रश्नासाठी, मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यापूर्वी संघाकडे या. आपल्या समस्या संघाच्या निदर्शनास आणून द्या. आम्ही सरकारशी चर्चा करून उपाययोजना करू, असे आवाहन होसबळे यांनी भारतीय मजदूर संघाला केले.
इंधन दरवाढ आणि भूमिसंपादन कायद्याच्या निषेधार्थ शनिवारी युवक काँग्रेसने वर्धा मार्गावरील साई मंदिराजवळ अमित शहा यांना काळे झेंडे दाखविले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बन्टी शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
परखड मत : भूमी अधिग्रहण कायदा, थेट विदेशी गुंतवणूक या विषयांवर संघ पूर्णपणे मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. संघाने वेळोवेळी या विषयावर आपले मत सरकारच्या प्रतिनिधींकडे मांडले आहे.
च्सरकार बदलले असले तरी अधिकारी तेच आहेत. त्यामुळे सर्वकाही ठीक व्हायला थोडा वेळ लागेल. आपल्याला सरकारसोबत संघर्ष करायचा नसून प्रतिसादात्मक सहकार्य ठेवायचे आहे.
च्आपण आपल्याच लोकांच्या भूमिकेवर संशय घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.