पुण्याजवळ ७४ जणांना विषबाधा
By Admin | Published: May 23, 2017 03:07 AM2017-05-23T03:07:31+5:302017-05-23T03:07:31+5:30
रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे एका विवाह समारंभात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (पुणे) : रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे एका विवाह समारंभात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले.
रोकडे आणि भोगले परिवारातील विवाह समारंभ झाला. त्या वेळी आइसक्रीम खाल्ल्यानंतर काहींना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. विवाहस्थळी यामुळे एकच गोंधळ उडाला. विवाहानंतर वधू-वरांना आशीर्वाद देऊन निरोप देत असतानाच वर आणि वधू पक्षाकडील लोकांची विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी धावपळ उडाली. ५४ जणांना औंध रुग्णालयात, तर २० जणांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दोन्ही रुग्णालयांतील १५ जणांना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी सोडले आहे. इतरांना खबरदारीचा उपाय म्हणून अद्यापही देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वायसीएममध्ये तीन पुरुष, नऊ मुले, सहा महिलांवर उपचार करण्यात आले. एक महिला, तीन पुरुष, दोन मुले यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले, अशी माहिती वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश इंगळे यांनी दिली.