७४वर्षीय वृद्धाने सहा जणांना उडवले
By admin | Published: January 11, 2016 03:25 AM2016-01-11T03:25:30+5:302016-01-11T03:25:30+5:30
७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत सहा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत.
मुंबई : ७४ वर्षीय वृद्धाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत सहा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीत घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातातील सहाही जण बचावले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीपद पंजाबी असे या वृद्धाचे नाव असून, अंधेरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अंधेरी परिसरात राहत असलेला पंजाबी हा एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील तेली गल्लीतून टोयोटा कारमधून भरधाव वेगाने जात असताना त्याचा कारवरचा ताबा सुटला. या वेळी रिक्षाची वाट बघत उभ्या असलेल्या कुटुंबीयांतील चौघांसह दोन पादचाऱ्यांना ठोकरून पुढे जात त्याच्या कारने लोखंडी खांबाला धडक दिली. घटनास्थळाहून पळ काढत असताना स्थानिकांनी त्याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले गुप्ता कुटुंबीय मरोळ येथील रहिवासी आहेत. या अपघातात धनजी गुप्ता (३८), गीता धनजी गुप्ता (३७) आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासह धर्मेंद्र पांडे आणि विनय पांडे हे पादचारीही जखमी झाले. घरी जाण्यासाठी ते रिक्षाची वाट पाहत असताना पंजाबीच्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये आरोपी पंजाबीही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरू असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)