औरंगाबाद पोलिसांसाठी ७४० घरांचा प्रकल्प

By Admin | Published: April 10, 2017 08:12 PM2017-04-10T20:12:48+5:302017-04-10T20:12:48+5:30

जुन्या पोलीस वसाहतीत ५४० घरांच्या बांधकामाचे उदघाटन महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

740 housing projects for Aurangabad police | औरंगाबाद पोलिसांसाठी ७४० घरांचा प्रकल्प

औरंगाबाद पोलिसांसाठी ७४० घरांचा प्रकल्प

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - शहर पोलिसांकडून घरांची सतत मागणी होत आहे, मात्र उपलब्ध घरे कमी पडत असल्याने आयुक्तालयातील जुन्या पोलीस वसाहतीत ५४० घरांच्या बांधकामाचे उदघाटन महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासानुसार क्रांतीचौकात आणखी ७४० घरे बांधण्यास गृहविभागाने मान्यता दिल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यासाठी २४० कोटी रुपये खर्चालाही शासनाने प्रशासकीय मान्यता दिली.
शहर पोलीस दलाचे संख्याबळ साडेतीन हजाराहून अधिक आहे. शिवाय आगामी काळात हे संख्याबळ वाढणारच आहे. येथे रुजू होणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने हवी असतात. यामुळे प्रत्येक जण घरांसाठी अर्ज करीत असतो. परंतु उपलब्ध घरे अत्यल्प आहेत. शिवाय जुन्या घरांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. यामुळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी घरे भाड्याने घेऊन राहावे लागते. पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम पोलीस आयुक्तालयामागील जुन्या पोलीस वसाहतीमधील घरे पाडून तेथे ५४० निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. ही घरे तयार झाल्यानंतरही घरे कमी पडणार असल्याचे पाहून क्रांतीचौक ठाण्यामागील जुन्या पोलीस कॉलनीतील जीर्ण घरे पाडून तेथे ७४० निवासस्थानांची नवीन वसाहत उभारण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. २४० कोटी रुपयांच्या या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळाल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, क्रांतीचौक पोलीस ठाण्याची इमारत पाडण्यात येणार आहे. क्रांतीचौक ठाणे निरालाबाजार रोडवर असावे, असा विचार काही अधिकाऱ्यांकडून पुढे आला आहे. यामुळे नवीन ठाण्याची इमारत निरालाबाजार रोडवर अथवा आहे त्याच ठिकाणी बांधावी, याबाबत निर्णय व्हायचा आहे. शिवाय सिडको पोलीस कॉलनीत २५० घरेही शहर पोलिसांसाठी आहेत.
तीन महिन्यात होईल निविदा प्रक्रिया पूर्ण
क्रांतीचौक पोलीस वसाहतीत नव्याने उभारल्या जाणाऱ्या निवासस्थानाच्या इमारतीचे स्वरुप हे तळमजला आणि त्यावर १५ मजले असे असेल. शिवाय लिफ्टची सुविधाही असेल. या वसाहतीच्या बांधकामाचा आरखडा तयार करण्यात आला असून नाशिक येथील एका कंत्राटदाराने हे काम करण्याची तयारी दर्शविली. पोलीस वसाहतीच्या कामासंदर्भात निविदा प्रक्रियेचे काम तीन महिन्यात पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल.

Web Title: 740 housing projects for Aurangabad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.