७.५ लाख किलो डाळ गोदामात पडून
By admin | Published: May 5, 2016 02:28 AM2016-05-05T02:28:31+5:302016-05-05T02:28:31+5:30
राज्यातील गोदामांमध्ये ७.५ लाख किलो डाळ पडून आहे. व्यापारी हा माल घ्यायला तयार नसल्याने डाळ गोदामात सडत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी
मुंबई : राज्यातील गोदामांमध्ये ७.५ लाख किलो डाळ पडून आहे. व्यापारी हा माल घ्यायला तयार नसल्याने डाळ गोदामात सडत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.
गेल्या वर्षी डाळींचे भाव गगनाला भिडले होते. सामान्य नागरिकांच्या रोजच्या जेवणातील डाळ प्रति किलो २०० रुपयांच्याही पुढे गेली होती. व्यापारी आणि दलालांनी दर वाढ घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. काँग्रेसने तर डाळींच्या दरवाढीविरोधात आंदोलन करीत दलालांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने कारवाई करीत काही गोदामांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात डाळ पकडली होती. जप्त केलेली ही डाळ सरकारने विकायला बाहेर काढली होती पण व्यापाऱ्यांनी सदर डाळ विकत घेतली नाही. त्यामुळे राज्यातील गोदामांत ७.५ लाख किलो डाळ अशीच सडत असल्याची माहिती मिळाल्याचे संजय निरुपम यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सरकारी गोदामात पडून असलेल्या डाळींचा साठा सरकारने बाहेर काढावा. हा साठा बाहेर आल्यास डाळींचा पुरवठा वाढून बाजारातील डाळींचे दर खाली येतील. त्यासाठी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून द्यावी. गोदामात या डाळी सडविण्यापेक्षा गोरगरीब जनतेला ती मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.