नक्षलींसाठी जाणारी ७५ लाखांची रोकड हस्तगत
By admin | Published: May 24, 2017 02:48 AM2017-05-24T02:48:23+5:302017-05-24T02:48:23+5:30
नक्षलींची प्रसिद्ध पत्रके आणि ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या तेलंगणातील तीन व्यापाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलींची प्रसिद्ध पत्रके आणि ७५ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या तेलंगणातील तीन व्यापाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील रक्कम आणि बोलेरो गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या विशेष अभियान पथकाचे उपनिरीक्षक मिलन कुरकुटे व त्यांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबवून मध्यरात्री परत येत असताना त्यांना आलापल्ली येथे क्रमांक नसलेले वाहन संशयास्पदरित्या भामरागडच्या दिशेने जाताना आढळले. पथकाने सावरकर चौकात ते वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत ७५ लाख रुपये आणि नक्षल पत्रके सापडली. गाडीतील पहाडिया तुळशीराम तांपला, रवी मलय्या तनकम आणि नागराज समय्या पुट्टा (सर्व रा.तेलंगणा राज्य) या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
नक्षलग्रस्त भागात बॅनरयुद्ध
पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथील लढाईला ५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केले आहे. दुसरीकडे आदिवासी बचाव समितीच्या नावाने जिमलगट्टा परिसरात बॅनर लावण्यात येऊन नक्षल्यांनी आदिवासींची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने पेटलेल्या या बॅनरयुद्धामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.