७५ झोपड्यांवर कारवाई
By admin | Published: January 16, 2017 02:11 AM2017-01-16T02:11:27+5:302017-01-16T02:11:27+5:30
‘एम/पूर्व’ येथील रफीकनगर नाल्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ७५ अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या निष्कासन कारवाईदरम्यान तोडण्यात आल्या.
मुंबई : ‘एम/पूर्व’ येथील रफीकनगर नाल्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ७५ अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या निष्कासन कारवाईदरम्यान तोडण्यात आल्या. या झोपड्यांमुळे प्रभाग क्रमांक १२९मधील रफीकनगर नाला रुंदीकरणाचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते. या प्रकरणी एम/पूर्व विभागाद्वारे सर्वेक्षण करून पात्रता निश्चित केल्यानंतर झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई नुकतीच करण्यात आली, असे एम/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी सांगितले.
ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे ८२ पोलीस कर्मचारी, महापालिकेचे सुमारे ४८ कामगार, ४ जेसीबी व ८ डम्परची मदत घेण्यात आली. या कारवाईमुळे रफीकनगर नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पावसाळ्याअगोदर पूर्ण होऊन एम पूर्व विभागातील अहिल्याबाई होळकर मार्ग, ९० फुटी रस्ता तसेच शिवाजीनगर बस डेपोजवळच्या परिसरातील पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यास व पयार्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)